पदरवाडीवासीयांचे स्थलांतर आवश्यक : गटविकास अधिकारी शिंदे

भूस्खलनाचा धोका कायम
राजगुरूनगर – पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर खेड तालुक्यातील भीमाशंकर जवळील पदरवाडीमध्ये जमिनीला भेगा पडल्या असून येथील नागरिकांची स्थलांतराची गरज ही वस्तूस्थिती आहे. या भेगांची प्रत्यक्ष पाहणी केली. भूवैज्ञानिकाशी पाठपुरावा सुरू केला आहे. ग्रामस्थांची चर्चा केल्यानंतर त्यांनी भीमाशंकर येथे स्थलांतर व कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. येथील परिस्थिती पाहता ते गरजेचे आहे. पुनर्वसनाचा प्रस्ताव खेडचे प्रांत अधिकारी तहसीलदार यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी कार्यलयाकडे लवकरच पाठविण्यात येईल, अशी माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली.
पदरवाडी येथे गावाच्या मागे जमिनीला जवळपास 300 फूट लांब पडलेल्या भेगेमुळे पदरवाडीला भूस्खलनाचा धोका आहे. भीमाशंकर बाजूकडील उंचकड्याचा धोका असल्याने या पदरवाडीतील परिस्थितीची पाहणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यावेळी गटविकास अधिकारी विशाल शिंदे, पशुधन अधिकारी योगेश शेळके, वाडा मडंलाधिकारी शारदा बढे यांच्यासह पंचायत विस्तार अधिकारी मोरे, ग्रामसेवक रुपेश मोरे, शिवाजी तेलंगे, तलाठी दीपक धायगुडे, खोल दरीतून मार्ग काढीत मंगळवारी (दि. 8) केली.
यावेळी भोरगिरीचे सरपंच दत्तात्रय हिले, स्थानिक प्रभाकर गवारी, सोमा काठे, गोविंद डामसे, दत्तात्रय डामसे, भानुदास दिवाळे, राम हिले, काळुराम गवारी, कुंडलिक हांडे, जिजाबाई हांडे, कैलास काठे, ज्ञानेश्वर काठे, रवींद्र डामसे, तुकाराम दिवाळे, गणेश दिवाळे, सचिन हांडे, अंकुश गवारी, भाऊ हिले, दूदा डामसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पदरवाडीच्या खाली उंच कडा आहे त्यावर असलेल्या सपाट जागेत ही पदरवाडी असून तिच्या वरच्या म्हणजे भीमाशंकर बाजूला नागफणी बाजूकडे उंच कडा आहे. या कड्याच्या दगडी कधीही खाली कोसळण्याची शक्यता आहे. पदरवाडीला वरून कडा आणि मागून भूस्खलन असा दुहेरी धोका आहे. या भेटी दरम्यान पशुधन अधिकारी डॉ. योगेश शेळके यांनी पदरवाडीतील जनावरांचा आढावा घेतला. लवकरच येथील जनावरांचे टॅगिंग करण्यात येईल असे सांगितले.
अशी आहे लोकसंख्या
पदरवाडी स्थानिकांच्या बैठकीतील वाडीतील अनेक समस्यांबाबत चर्चा झाली. पदरवाडीची 74 लोकसंख्या आहे. एकूण 16 घरांपैकी 3 कुंटुबे भीमाशंकरला 1 कुंटुब नेरुळ येथे वास्तव्यास आहे. उर्वरीत 12 कुंटुबात 56 पुरुष , महिला, युवक, लहान मुले आहेत. तर 18 तात्पुरते स्थलांतरित आहेत. 74 लोकसंख्येपैकी 19 मुले-मुली पहिली ते 12 वीपर्यंत आणि पुढील शिक्षणासाठी शासकीय आश्रमशाळा, आदिवासी वसतिगृहात आहेत. आता सध्या पती-पत्नी सह तरुण युवकांची संख्या 30च्या आसपास आहे. 1 ते 4 वयोगटातील 6 मुले आहेत.





