इमारतींच्या जंगलामुळे कावळ्यांचे स्थानांतरण; पितृपक्षात पितरांना घास टाकण्यासाठी कावळे मिळत नसल्याने अडचण

अमरावती : गणेशोत्सव संपला की, पितृपक्ष सुरू होते. या कालावधीत आपापल्या परंपरेनुसार नागरिक पितरांना पान टाकत असतात. त्यावेळी घास काढून तो पितरांचे प्रतीक अशी मान्यता असलेल्या कावळ्याने खावा ही अपेक्षा असते. त्यामुळे द्रोणात घास काढून तो गच्चीवर, घराबाहेर ठेवून काव, काव असे ओरडत कावळ्यांना बोलावतात. परंतु, कावळेच येत नाहीत. घास तसाच पडलेला राहतो.
कारण, शहरात इमारतींचे जंगल वाढल्याने कावळ्यांनी जंगल, शहराबाहेर स्थानांतरण केले आहे. एखाद दुसरा कावळा अभावानेच शहरात दिसतो. शहरात मोठ्या प्रमाणात झाडे कापण्यात आली. फ्लॅट स्कीम, अपार्टमेंट, रहिवासी इमारतींची संख्या वाढली. त्यामुळे कावळ्यांनी हळूहळू त्यांचा रहिवास शहराबाहेर हलवला. कारण, त्यांना घनदाट झाडांमध्ये राहणे आवडते. इमारतींच्या जंगलात त्यांना राहणे जमत नाही. कावळ्यांची संख्या घटली नाही तर त्यांनी शहरातून काढता पाय घेतला असल्याचे पक्षितज्ज्ञांचे मत आहे.
शहरात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातही मोठ्या प्रमाणात कावळे आढळायचे. परंतु, आता तेथेही कावळे दिसत नाही. शहराच्या बाहेरील भागात मात्र, काही प्रमाणात कावळे दिसतात. मात्र, शहराचा आकार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कावळे आधी ज्या ठिकाणी हमखास आढळायचे, अशा गडगडेश्वर मंदिर, भातकुली, दस्तूरनगर, पार्वतीनगर भागात सध्या दिसत नाहीत. कारण, येथे आता नागरिकांनी घरे बांधल्याने कावळ्यांचा रहिवास मात्र हिरावला गेला.
कबुतरांची संख्या मात्र वाढली
इमारतींचे जंगल वाढल्यामुळे एकिकडे कावळे शहरात फिरकेनासे झाले. मात्र, त्याचवेळी कबुतरांना इमारतीत राहणे आवडते. त्यामुळे शहरातील प्रत्येक मोठ्या रहिवासी कॉलनी, फ्लॅट, अपार्टमेंटमध्ये रोगराई पसरवणारे, घाण करणारे कबुतर मात्र वाढले आहेत. त्यामुळे फ्लॅट स्कीममधील रहिवासी त्रस्त झाल्याची माहिती पक्षितज्ज्ञांद्वारे देण्यात आली.
कावळ्यांची संख्या घटली नाही
कावळ्यांची संख्या घटली नाही. तर त्यांचा रहिवास असलेल्या झाडांची संख्या कमी होऊन इमारतींचे जंगल वाढल्यामुळे ते शहराबाहेर स्थानांतरित झाले आहेत. मागील दीड वर्षांपासून हे चित्र आहे. त्यामुळे शहरात कावळे फारसे दृष्टिपथास येत नाहीत. शहराबाहेर ते दिसतात.
-डॉ. जयंत वडतकर,
पक्षीतज्ज्ञ, मानद वन्यजीव सदस्य





