US Iran War 2026 : मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला असून अमेरिका आणि इस्रायल यांनी शनिवारी सकाळी इराण मधील सुमारे ३० ठिकाणांवर समन्वित हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. इराणला अण्वस्त्रधारी राष्ट्र होऊ देणार नाही, असा इशारा देत डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका जाहीर केली. या कारवाईनंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेत इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केल्याचे वृत्त आहे. तसेच आखाती देशांतील अमेरिकन तळांना लक्ष्य करत इराणने बहरीन, कतार, सौदी अरेबिया आणि कुवैतमधील ठिकाणांवर हल्ले चढवले. विशेषतः बहरीनमधील अमेरिकेच्या जुफैर लष्करी तळावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर काही आखाती देशांनी आपली हवाई हद्द तात्पुरती बंद केली आहे. इराणकडून या प्रत्युत्तरात्मक कारवाईत अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आल्याने संघर्षाचा विस्तार पाच देशांपर्यंत झाल्याचे दिसत आहे. अमेरिकेचा मोठा नौदल तळ बहरीनमध्ये असल्याने त्या परिसरात तणाव अधिक वाढला आहे. तेल पुरवठ्यावर परिणामाची शक्यता सौदी अरेबिया आणि कुवैतसारख्या प्रमुख तेल उत्पादक देशांमध्ये तणाव निर्माण झाल्याने जागतिक तेल पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संघर्ष तीव्र झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, भारत सरकारने संबंधित देशांमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अलीकडेच भारताचे पंतप्रधान इस्रायल दौर्यावर गेले होते, त्यामुळे या घडामोडींमध्ये भारताची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. इराणकडून सुरू असलेल्या कारवायांमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत. या संघर्षाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.