“खून का बदला खून से” ! इस्रायलच्या हल्ल्याने इराणचा तिळपापड ; म्हणाले,”मध्य पूर्व एका भयंकर युद्धाकडे…”

Israel Iran War । इराणच्या लष्करी आणि आण्विक तळांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणी सैन्याची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. इराणी सशस्त्र दलांनी शुक्रवारी स्पष्ट इशारा दिला की इस्रायलला “मोठी किंमत मोजावी लागेल”. या हल्ल्याची बातमी ऐकून जग जागे झाले तेव्हा इराणी सैन्याने इस्रायलला “झियोनिस्ट राज्य” असे संबोधून इशारा दिला.तसेच “ते आता या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत” असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. इराणी सैन्याने सोशल मीडियावर “खून का बदला खून से” म्हणत युद्धच पुकारले आहे.
तेहरानच्या निवासी भागात हल्ला केल्याचा आरोप Israel Iran War ।
इराणी सशस्त्र दलाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अबोलफझल शेखरची यांनी सरकारी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, “इस्रायली हल्ल्यांमध्ये केवळ लष्करी प्रतिष्ठानांवरच नव्हे तर तेहरानमधील निवासी भागांवरही हल्ला करण्यात आला.”असे सांगण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, हा हल्ला अमेरिकेच्या पाठिंब्याने करण्यात आला आणि तो “क्रूर आणि नियोजित आक्रमण” असल्याचे वर्णन केले. शेखरची म्हणाले की, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.”
आमचे कमांडर आणि नागरिक शहीद
जनरल शेखरची यांनी आरोप केला की, झिओनिस्ट शत्रूने अमेरिकेच्या मदतीने नागरिकांच्या घरांवर आणि प्रमुख अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर क्रूरपणे हल्ला केला आहे. या बेपर्वा हल्ल्यात आपले अनेक कमांडर आणि नागरिक शहीद झाले आहेत. त्यांनी इशारा दिला की इस्रायलने खूप मोठी चूक केली आहे आणि आता त्यांना त्याचे कठोर आणि निर्णायक उत्तर मिळेल.
आयआरजीसी प्रमुखाच्या मृत्यूची बातमी
या विधानासह, इराणी मीडिया चॅनेल IRIB आणि IRNA ने वृत्त दिले आहे की, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे कमांडर-इन-चीफ जनरल हुसेन सलामी गुरुवारी लक्ष्यित हल्ल्यात मारले गेले आहेत. याशिवाय, अनेक वृत्तपत्रांनी असेही वृत्त दिले आहे की जनरल गुलाम अली रशीद आणि प्रमुख अणुशास्त्रज्ञ डॉ. फरीदून अब्बासी आणि डॉ. तेहरानची हे देखील या हल्ल्यात मारले गेले आहेत.
इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायल सज्ज Israel Iran War ।
दोन इस्रायली अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तसंस्थेला माहिती देताना,”पुढील काही तासांत इराणकडून होणाऱ्या संभाव्य प्रत्युत्तर हल्ल्यासाठी देश सतर्क आहे. ” असे म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, इराण शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागू शकतो. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, इस्रायली प्रशासनाने जनतेला अनेक वेळा इशारे दिले आहेत. गेल्या एका तासात जारी केलेल्या निवेदनात पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, “इस्रायली नागरिकांना बराच काळ सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये राहण्याची तयारी ठेवावी लागू शकते.” त्यांचा हा इशारा बराच काळ चालणाऱ्या युद्धाकडे असल्याचे म्हटले जात आहे.



