Micheál Martin : मायकेल मार्टिन बनले आयर्लंडचे पंतप्रधान

डब्लिन, (आयर्लंड) – आयर्लंडच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये झालेल्या मतदानानंतर फियाना फेलचे नेते मायकेल मार्टिन यांना नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. काल देशातील फाइन गेल आणि फियाना फेल या दोन मोठ्या मध्य-उजव्या पक्षांच्या,आघाडीने मार्टिन यांना दुसऱ्यांदा आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवडले. काही अपक्ष सदस्यांनीही मार्टिन यांच्या बाजूने मतदान केले आहे.
६४ वर्षीय मार्टिन २०२० ते २०२२ दरम्यान आयर्लंडचे पंतप्रधान होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या उत्तरार्धासाठी फाइन गेल यांच्याकडे नेतृत्व सोपवले होते. दोन्ही पक्षांमधील करारानुसार मावळते पंतप्रधान सायमन हॅरिस २०२७ च्या अखेरीस पंतप्रधान म्हणून परत येणार आहेत.
गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आयर्लंडच्या मागील सत्ताधारी युतीचे सदस्य असलेल्या फियाना फेल आणि फाइन गेल या पक्षांनी सत्ता टिकवून ठेवली. १७४ जागांच्या डेल संसदेमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्रित ८६ जागा जिंकल्या, बहुमतासाठी फक्त दोन जागा कमी पडल्या.
मुख्य विरोधी पक्ष सिन फेनने ३९ जागा जिंकल्या, ४८ जागा जिंकणाऱ्या फियाना फेल नंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आघाडी करून सरकार स्थापन केले आहे.





