MI vs RCB : वानखेडेवरील ऐतिहासिक विजयानंतर RCB ला दणका! BCCI ने केली मोठी कारवाई

MI vs RCB Rajat Patidar Fined For Slow Over Rate in IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्यील २०वा सामना एमआय आणि आरसीबी यांच्यात ७ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने १० वर्षांनंतर वानखेडे स्टेडियमवर मुंबईवर १२ धावांनी विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर आरसीबीला मोठा फटका बसला. कारण या सामन्यातील स्लो ओव्हर रेटच्या चुकीसाठी कर्णधार रजत पाटीदारला बीसीसीआयने दंड ठोठावला आहे.
रजत पाटीदारला ठोठावला दंड –
या हंगामात आरसीबी संघाने पहिल्यांदाच चूक केली आहे, ज्यामुळे रजतवर फक्त १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याच्या शेवटच्या क्षणी खूप तणावपूर्ण वातावरण होते. दरम्यान, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने थोडा वेळ घेतला आणि शेवट्या षटकात क्रृणाल पंड्याच्या हाती चेंडू सोपवला. या सगळ्यात काही वेळ वाया गेला आणि त्यामुळे बंगळुरू संघ वेळेवर षटके पूर्ण करू शकला नाही आणि आता कर्णधाराला त्याची शिक्षा मिळाली आहे.
Rajat Patidar has been fined 12 Lakhs for the slow Over-rate against Mumbai Indians. 🏆 pic.twitter.com/sDZjWXZQ9i
— Johns. (@CricCrazyJohns) April 8, 2025
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर-रेट राखल्याबद्दल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याला दंड ठोठावण्यात आला आहे, असे आयपीएलने जारी केलेल्या एका मीडिया रिलीजमध्ये म्हटले आहे. कारण आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत या हंगामात त्याच्या संघाचा हा पहिलाच गुन्हा होता, जो किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे. त्यामुळे पाटीदारला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.
हेही वाचा – Ishant Sharma : इशांत शर्मावर बीसीसीआयकडून मोठी कारवाई! मिळाली ‘ही’ मोठी शिक्षा
एमआय विरुद्ध आरसीबी सामना कसा राहिला?
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने ५ विकेट्स गमावून २२१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, तिलक वर्माचे अर्धशतक आणि हार्दिक पंड्याच्या स्फोटक खेळीनंतरही मुंबई इंडियन्सला लक्ष्य गाठण्यात अपयश आले. मुंबईचा संघ निर्धारित षटकात ९ बाद २०९ धावाच करु शकला. आरसीबीसाठी विराट कोहलीने सर्वाधिक ६७ धावांचे, तर मुंबईसाठी तिलक वर्माने ५६ धावांचे योगदान दिले. तसेच क्रृणाल पंड्याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.





