Mhatoba Utsav – हजारो हिंजवडी वाकडकर भाविक बारप्याहून शेले घेऊन मंगळवारी रात्री दहा वाजता हिंजवडीत दाखल झाले.ग्रामस्थांनी शेलेकऱ्यांचे मोठ्या जल्लोषात पुष्पवृष्टी करून स्वागत केले. माणची शिव ओलांडताच हिंजवडीच्या प्रवेशद्वारावर क्रेन जेसीबी मधून आकर्षक फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली. तर आकर्षक विद्युत रोषणाई व फटाक्यांचे आतिषबाजीने शेलेकऱ्यांचे मिठाई भरवून स्वागत करण्यात आले. गावठाणात प्रदक्षिणा घातल्यानंतर बारप्याहुन आणलेले 50 फूट लांबीचे शेले हिंजवडी गावठाणातील मारुती मंदिरासमोर शेले ठेवण्यात आले. वाकड-हिंजवडीतील सुतार परिवार व ग्रामस्थांनी दिवसभर बगाड रथाची उभारणी केली. आणलेल्या शेल्याच्या लाकडाला आकार देण्यात आला. दुपारनंतर मिरवणूक रथावर त्याची उभारणी करण्यात आली. वाकड हिंजवडी करांचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हातोबा देवाच्या उत्सवाला यंदा मोठ्या भक्तिभावाने व धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. शेले आणण्यास गेलेल्या भाविकांचे गावोगावी जंगी स्वागत करण्यात आले. गावोगावी महिलांनी औक्षण केले, अनेकांनी नारळ फोडून दर्शन घेतले.हनुमान जयंतीला दुपारी चारनंतर हिंजवडी गावाठानातून वाकडच्या दिशेने बगाड मीरवणूक निघणार. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी व म्हातोबा देवाच्या दर्शनासाठी मुळशी तालुका, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक वाकड हिंजवडला मोठी गर्दी करतात.