म्हाडा पुणे विभाग: सहा हजार घरांसाठी ३० हजार अर्ज

पुणे – म्हाडा पुणे विभागाकडील 6 हजार 294 घरांसाठी मागील दीड महिन्यात सुमारे 38 हजारांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास दि. 10 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात झाली. दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीमुळे अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. ती मान्य करून म्हाडाने या सोडतीस दि. 10 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
म्हाडाने काढलेल्या सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य मधील 2 हजार 340 घरे आहेत, तर म्हाडाच्या विविध योजनेतील घरांची संख्या 93 आहे, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांची संख्या 418, 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील सदनिकांची संख्या ही 3 हजार 312 आहे. 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील घरांची संख्या 131 आहे.
या घरांसाठीऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची मुदत दि.10 डिसेंबर पर्यंत आहे, तर ऑनलाइन पेमेंट,अनामत रक्कम स्वीकृती अंतिम मुद्त दि.12 डिसेंबरपर्यंत आहे. सोडत दि. 7 जानेवारी 2025 रोजी काढण्यात येणार आहे.
म्हाडाच्या घरांसाठीची सोडतीपूर्वीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, सोडत, तसेच सोडतीनंतरची ताबा प्रक्रिया संपुर्णपणे संगणकीकरणाद्वारे ऑनलाइन पार पाडण्यात येणार असल्याने सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आहे, अशी माहिती साकोरे यांनी दिली.
अर्जासाठी संकेतस्थळे
म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी प्रथम www.mhada.gov.in अथवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर प्रथम येणाऱ्यास प्रधम प्राधान्य तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती साकोरे यांनी दिली.





