Weather Alert: महाराष्ट्रावर दुहेरी हवामान संकट; उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा तडाखा
Weather Alert: हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार, १३ ते १६ मार्चदरम्यान मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. १५ ते १६ मार्चदरम्यान धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता आहे.

Weather Alert: विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रावर सध्या दुहेरी हवामान संकट ओढवले आहे. एकीकडे उष्णतेची तीव्र लाट नागरिकांना होरपळवत आहे, तर दुसरीकडे पुढील ७२ तासांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अमरावती, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही जिल्ह्यांत तापमान ४० अंश सेल्सिअसपुढे गेले आहे.
उष्णतेची लाट कधीपर्यंत?
उत्तर-पश्चिमेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात सातत्याने वाढ होत असून पुढील दोन दिवस ही लाट कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. मुंबईत गुरुवारी कमाल तापमान ३३ अंशांवर नोंदवले गेले, मात्र राज्याच्या इतर भागांत उष्णतेचा जोर कायम आहे. उत्तर कोकण भागातही पुन्हा एकदा उष्णतेची लाट येण्याचे संकेत असून मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत पुढील ४८ तास प्रचंड उकाडा आणि दमट हवामान राहणार आहे. या भागात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
विभागनिहाय हवामान स्थिती
विदर्भ : राज्यात सर्वाधिक संकट विदर्भात आहे. मार्चच्या सुरुवातीपासूनच पारा ४० अंशांच्या आसपास राहिला असून आता अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत आजच पावसाचा धोका असून शनिवारपासून संपूर्ण विदर्भात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. १४ आणि १५ मार्चदरम्यान मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात सध्या तापमानाचा पारा वाढलेला आहे. दिवसभर उष्ण हवामान राहील, मात्र पुढील २४ तासांत वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा आहे.
मध्य महाराष्ट्र : हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार, १३ ते १६ मार्चदरम्यान मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. १५ ते १६ मार्चदरम्यान धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता आहे.
१७ ते २० मार्च : आणखी तीव्र हवामान बदलाचा इशारा
१७ ते २० मार्चदरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि गारपिटीचीही शक्यता नाकारता येत नाही. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात या हवामान घडामोडींची तीव्रता विशेषतः १८ ते २० मार्चदरम्यान वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नागरिक आणि शेतकऱ्यांना आवाहन –
हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळण्याचे, पुरेसे पाणी पिण्याचे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवण्याचे किंवा झाकण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले असून वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.





