मेट्रो प्रकल्पबाधितांना मिळतेय हक्काचे घर

पुणे -मेट्रो मार्गाच्या स्टेशनसाठी आवश्यक असलेली शिवाजीनगर येथील कामगार पुतळा आणि राजीव गांधीनगर येथील झोपडपट्टीतील रहिवाशांना विमाननगर व हडपसर येथील घरे ताब्यात देण्याची प्रक्रिया दि. 24 पासून सुरू करण्यात येणार आहे.
“महामेट्रो’कडून पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दरम्यानची मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. तर हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम “पीएमआडीए’कडून हाती घेण्यात आले आहे.
हे दोन्ही मेट्रो मार्ग शिवाजीनगर-कामगार पुतळा झोपडपट्टीच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्टेशनमध्ये एकत्र येऊन मिळणार आहेत. महामेट्रोची मेट्रो या स्टेशनपासून स्वारगेटकडे, तर पीएमआरडीएची मेट्रो खराडीकडे जाणार आहे.
त्याठिकाणी सुमारे 1 हजार 264 झोपड्या आहेत. त्यांचे विमाननगर आणि हडपसर येथील पुनर्वसन प्रकल्पातील गाळ्यांमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी एसआरए प्राधिकरणाकडून तेथील झोपडीधारकांसाठी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली होती. यामध्ये सुमारे साडेआठ हजार नागरिक सहभागी झाले होते.
पहिल्या टप्प्यात 874 गाळे धारकांना गाळ्यांचे वाटप करण्यात होते. दरम्यान, प्रकल्प बाधितांना झोपडीच्या बदल्यात आता हक्काचे आणि मजबूत घर मिळणार असल्याने त्यांच्यातही समाधानाचे वातावरण आहे.
कामगार पुतळा व राजीव गांधीनगर येथील झोपडीधारकांचे पुनर्वसन विमाननगर आणि हडपसर या ठिकाणी करण्यासाठी ऑनलाइन लॉटरी यापूर्वीच काढण्यात आली होती. लाभार्थींना प्रत्यक्षात घरांचा ताबा देण्याची कार्यवाही सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे.
-राजेंद्र निंबाळकर, सीईओ, एसआरए





