मिथेन वायूच्या गळतीमुळे इराणमधील खाणीत स्फोटात; तब्बल ३२ जण ठार

तेहरान – इराणमधील एका कोळशाच्या खाणीत मिथेन वायूच्या गळतीनंतर झालेल्या स्फोटात किमान ३२ खाण कामगारांचा मृत्यू झाला आहे आणि अन्य १७ जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर खाणीमध्ये इतर १८ कामगार अडकून पडले आहेत, असे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
राजधानी तेहरानच्या अग्नेयेला ५४० किलोमीटर अंतरावरील तबास येथील कोळशाच्या खाणीत शनिवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. खाणीत जमिनीपासून ७०० मीटर खोलीवरच्या बोगद्यात हा स्फोट झाला.
खाणीतील सर्व कामगारांना वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आणि कामकारांच्या नातेवाईकांना मदत देण्याचे आदेश इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कीयान यांनी दिले आहेत.
इराणमध्ये तेलाबरोबर खाणीतल्या कोळशाचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. दरवर्षी ३.५ दशलक्ष टन कोळशाचा वापर होतो. मात्र देशातल्या खाणीतून केवळ १.८ दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन घेतले जाते. उर्वरित कोळशाची आयात केली जाते.





