Satara | मेटगुताडला शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग उत्साहात

पाचगणी (प्रतिनिधी)– महाबळेश्वर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने मेटगुताड (ता. महाबळेश्वर) येथे तालुकास्तरीय शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षा मार्गदर्शन वर्ग उत्साही वातावरणात झाला.
या मार्गदर्शन वर्गास गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, शिक्षण विस्तार अधिकारी अभिजित भालेराव, केंद्रप्रमुख दगडू ढेबे, विनायक पवार, राज्यस्तरीय मार्गदर्शक व माचुतरचे केंद्रप्रमुख नामदेव धनावडे, आसणी शाळेचे मुख्याध्यापक संपत शेलार, भोगवलीमुरा शाळेचे मुख्याध्यापक शामराव जुनघरे, शिवाजी राजापुरे, ज्ञानदेव शेलार व जयराज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा मार्गदर्शन वर्ग महाबळेश्वर तालुक्यातील पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि चौथी व सातवी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आला होता,
या मार्गदर्शन वर्गास तालुक्यातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या ८६ शाळांमधील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
शाळास्तरावर विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करुन दैनंदिन ऑनलाइन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गास उपस्थित राहणे, प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या पात्रतेची टक्केवारी वाढविणे आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्या वाढविणे यासाठीच ही कार्यशाळा आयोजित केली असल्याचे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
प्रथम सत्रात वर्णविचार, अक्षर, जोडाक्षर, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, काळ, वाक्याचे भाग इत्यादी घटकांचे उदाहरणांसह सविस्तर स्पष्टीकरण भाषा विषयतज्ज्ञ संपत शेलार यांनी केले.
आजवर १२५ हून अधिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडविणारे शामराव जुनघरे यांनी बुद्धिमत्ता चाचणी विषयांतर्गत येणारे घटक- उपघटक आकलन, वर्गीकरण, क्रम ओळखणे, शब्द, संख्या, आकृत्या समसंबंध, समान पद ओळखणे, कूटप्रश्न, गटाशी जुळणारे पद, तर्क संगती व अनुमान यामधील उपघटकांचे विविध समीकरणे व क्लुप्त्यांचा वापर करून प्रश्न कसे सोडवावेत, याबद्दल मार्गदर्शन केले.
शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पक्के नियोजन, सातत्यपूर्ण सराव, विद्यार्थ्यांच्या प्रती व आपल्या कामाप्रती तळमळ आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. द्वितीय सत्रात नामदेव धनावडे यांनी गणित विषय अत्यंत सोपा १०० टक्के गुण मिळवून देणारा असल्याबाबत मार्गदर्शन केले.
शिक्षक प्रतिनिधी म्हणून शिवाजी राजापुरे व रूपाली कारंडे यांनी कार्यशाळेत काय मिळाले याबाबत प्रातिनिधिक प्रतिक्रिया दिल्या. वर्गाचे सूत्रसंचालन श्रीगणेश शेंडे यांनी केले. अभिजित भालेराव यांनी आभार मानले.





