Mahabaleshwar Panchayat Samiti – महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. या निवडीत सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शकुंतला रमेश चोरमले, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे संजय मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार सचिन मस्के, तसेच गटविकास अधिकारी विजय विभुते यांची प्रमुख उपस्थिती होती. महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीच्या निकालात तळदेव गटात शिवसेनेने आघाडी घेतली होती, तर भिलार गटात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले होते. या पार्श्वभूमीवर सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस, तर उपसभापतीपदी शिवसेना असा समन्वय साधत दोन्ही पदांची बिनविरोध निवड करण्यात आली.विशेष म्हणजे महाबळेश्वर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच उपसभापती पद शिवसेनेच्या वाट्याला आल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मकरंद पाटील – एकनाथ शिंदे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य अजित सपकाळ, बाबुराव संकपाळ, प्रवीण भिलारे, रमेश चोरमले, माजी जिल्हा परिषद सदस्य धोंडीराम जंगम, घनश्याम संकपाळ, सुभाष कदम, गणेश उतेकर, नितीन भिलारे, विठ्ठल दुधाने, महेंद्र पांगारे, सुभाष कारंडे, संभाजी भिलारे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येत तालुक्याच्या विकासासाठी मिळून काम करूया, असा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून भविष्यातही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करूया.” – राजूशेठ राजपुरे, जिल्हा बँकेचे संचालक “ना. एकनाथ शिंदे यांचे महाबळेश्वर तालुक्यावर प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मित्र पक्षाला सोबत घेऊन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तालुक्यातील एकही प्रश्न प्रलंबित राहू नये, यासाठी प्रयत्नशील राहू. आपल्या कामासाठी येणारा प्रत्येक नागरिक समाधानाने परत जावा, हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करूया.” – संजय मोरे, उपसभापती, पंचायत समिती, महाबळेश्वर