Satara | तळदेव बीएसएनएल कार्यालयाला ठोकले टाळे

पाचगणी, (प्रतिनिधी) – तळदेव परिसरातील ग्रामस्थांनी भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड कंपनीच्या भोंगळ कारभारविरोधात एल्गार केला असून शनिवारी संतप्त नागरिकांनी तळदेव येथील बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंजला टाळे ठोकून आपला संताप व्यक्त केला.
यावेळी ग्रामस्थ अंकुश जंगम, नारायण जंगम, किशोर जंगम विनायक जंगम, किरण जंगम अनिकेत कदम व ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती अशी की महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव तसेच तापोळा, सोळशी, कांदाटी, कोयना विभाग हा अतिदुर्गम असून याठिकाणी कसलीच रेंज नसल्याने या ठिकाणी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी तळदेव येथे भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड कंपनीने आपले कार्यालय सुरू केले आहे. परंतु हे कार्यालय असून अडचण आणि नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून हे टेलिफोन एक्सचेंज गेली 20 दिवस झाले बंद आहे. नेटवर्क नसल्याने या ठिकाणी भ्रमणध्वनी ही चालत नाहीत. त्यामुळे बीएसएनएल कंपनी पब्लिकला खेळवत असल्याची भावना या परिसरातील ग्राहकांना जाणवत आहे. तर नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत. सगळीच कामे रखडली आहेत.
बँकेचे व्यवहार असुद्या, लाईट बिल भरणे, किंवा कोणती दुःखद घटना घडली तरी समजणे अवघड झाले आहे. त्यामुळे नुसताच टॉवर दिसत असून तो शोपिस बनला आहे. या सेवेला अक्षरशः वैतागले आहेत. नागरिकांनी बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क साधून अभियंता यांचाशी चर्चा केली असता फक्त आश्वासन मिळत आहेत. त्यामुळे रेंजची वाट पाहून नागरिकांनी अखेर कार्यालयाच्या टाळे ठोकले आहेत.
या समस्येबाबत महाबळेश्वरचे माजी सभापती धोंडिबा जंगम हे स्वतः सातारा येथील ऑफिसला 5 दिवसापूर्वी जाऊन भेट घेतली. अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी त्यांना सुद्धा आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यामुळे आमच्या भागाकडे बीएसएनएलवाले लक्ष द्यायला तयार नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.





