Meta Layoffs: जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स आपला खर्च नियंत्रणात आणण्यासाठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मधील वाढत्या गुंतवणुकीचा ताळमेळ साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याच्या विचारात आहे. माध्यम वृत्तांनुसार कंपनी आपल्या जागतिक कर्मचारी संख्येपैकी तब्बल २० टक्के कर्मचारी कमी करू शकते. ३१ डिसेंबरपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार मेटामध्ये सुमारे ७९ हजार कर्मचारी कार्यरत होते. त्यामुळे ही कपात झाल्यास सुमारे १६ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. Facebook, Instagram आणि WhatsApp हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटाच्या माध्यमातून चालवले जातात. AI गुंतवणूक हे मुख्य कारण कंपनी आपले भविष्य AI आधारित तंत्रज्ञानाशी जोडत असून AI साधनांमुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढेल आणि अनेक कामांसाठी कमी माणसे लागतील, असा मेटाचा अंदाज आहे. त्यामुळे कंपनी कार्यपद्धती अधिक कार्यक्षम करण्यासाठी कर्मचारी संख्या घटविण्याच्या पर्यायांचा विचार करत आहे. मात्र अद्याप या संदर्भात अंतिम निर्णय घेतलेला नाही आणि त्यासाठी कोणतीही वेळमर्यादाही ठरवण्यात आलेली नाही. मेटाचे प्रवक्ते Andy Stone यांनी या वृत्तांना केवळ संभाव्य रणनीतींबाबतचे अंदाज असल्याचे सांगत अंतिम निर्णय झाल्याचे नाकारले. २०२८ पर्यंत ६०० अब्ज डॉलर गुंतवणुकीची योजना मेटाचे प्रमुख Mark Zuckerberg यांनी AI बळकट करण्यासाठी येत्या काळात प्रचंड गुंतवणूक केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याअंतर्गत कंपनीने २०२८ पर्यंत अत्याधुनिक डेटा सेंटर उभारण्यासाठी सुमारे ६०० अब्ज डॉलर गुंतवण्याची योजना आखली आहे. याशिवाय AI क्षेत्रातील तज्ज्ञ संशोधक व अभियंत्यांना आकर्षित करण्यासाठी काही प्रकरणांमध्ये चार वर्षांसाठी शेकडो मिलियन डॉलरचे वेतन पॅकेज देण्यात येत आहे. या तज्ज्ञांना एका विशेष ‘सुपरइंटेलिजन्स’ टीममध्ये सामील केले जात आहे. याशिवाय मेटाने AI एजंटसाठीचे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ‘मोल्टबुक’ विकत घेतले असून चीनी AI स्टार्टअप ‘मॅनस’ खरेदी करण्यासाठी किमान २ अब्ज डॉलर मोजण्याच्या प्रक्रियेत आहे. हेही वाचा – होर्मुझ सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रम्प यांची चीन, फ्रान्स, ब्रिटनला युद्धनौका पाठविण्याची विनंती; म्हणाले- “तुम्हालाही नौदल तैनात करावेच लागेल” यापूर्वीही झाली होती मोठी कपात मेटाने यापूर्वी २०२२ व २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये सुमारे ११ हजार, तर २०२३ च्या सुरुवातीला आणखी १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला होता. Zuckerberg यांनी त्या काळाला कंपनीचे “ईयर ऑफ एफिशिएंसी” असे संबोधले होते. अॅमेझॉन, ब्लॉकमध्येही कपात हा बदल केवळ मेटापुरता मर्यादित नाही. ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने जानेवारीत सुमारे १६ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली. Jack Dorsey यांच्या नेतृत्वाखालील फिनटेक कंपनी ब्लॉकनेही अलीकडेच जवळपास निम्मे कर्मचारी कमी केले. AI प्रणालींच्या वाढत्या क्षमतेमुळे अनेक कामे कमी खर्चात व जलद गतीने पूर्ण करता येत असल्याने हे निर्णय घेण्यात आल्याचे कंपन्यांनी सांगितले. मेटाच्या AI वाटचालीतील अडचणी मेटासाठी AI चा प्रवास पूर्णपणे सुकर राहिलेला नाही. कंपनीच्या Llama 4 मॉडेलच्या सुरुवातीच्या आवृत्त्यांवर बेंचमार्क निकालांवरून टीका झाली. त्यामुळे कंपनीने आपला सर्वात शक्तिशाली प्रस्तावित AI मॉडेल ‘बेहेमथ’ लॉन्च करण्याची योजना रद्द केली. सध्या AI संशोधन टीम ‘अॅव्होकाडो’ या नव्या मॉडेलवर काम करत आहे, मात्र ते अद्याप अपेक्षित कामगिरी करत नसल्याचे वृत्त आहे.