Mehul Choksi : मेहुल चोक्सी बेल्जियममध्ये असल्याचे निष्पन्न

नवी दिल्ली : फरार उद्योगपती मेहुल चोक्सी सध्या बेल्जियममद्ये असल्याचे आढळून आले आहे. बेल्जियममधील अँटवर्पमध्ये त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत राहत आहे, बेल्जियममध्ये रेसिडेन्सी कार्ड मिळवल्यानंतर,तो तेथेच वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचा ठावठिकाणा उघड झाल्यानंतर त्याला भारतात परत आणण्यासाठी बारतीय तपास अधिकार्यांनी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. भारतीय अधिकाऱ्यांनी बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली आहे. मात्र भारतीय अधिकाऱ्यांकडून या वृत्ताला त्वरित दुजोरा देण्यात आला नाही.
तब्बल १३ हजार ५०० कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी भारतात हवा असलेला चोक्सी बेल्जियमला जाण्यापूर्वी अँटिग्वा आणि बारबुडामध्ये राहत असल्याचे मानले जात होते. त्यांची पत्नी प्रीती बेल्जियमची नागरिक असल्याची माहिती मिळते आहे. चोक्सी सध्या बेल्जियममधील अँटवर्प येथे त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत राहत आहे आणि त्याला देशात एफ-रेसिडेन्सी कार्ड मिळाले आहे, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे.
चोक्सीने भारतात प्रत्यार्पणापासून वाचण्यासाठी बेल्जियममध्ये निवास मिळवण्यासाठी दिशाभूल करणारे आणि बनावट कागदपत्रे दिली आहेत. एका प्रसिद्ध कर्करोग रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी तो स्वित्झर्लंडला जाण्याची योजना आखत असल्याचा दावा देखील या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांनी बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग वापरून पंजाब नॅशनल बँकेतून १३ हजार ५०० कोटी रुपये हडप केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. न्यालयाने त्याला वारंवार जामीन नाकारल्यानंतर भारतात प्रत्यार्पणाला आव्हान देत आहे.





