Buldhana News : धक्कादायक! महिलेची रस्त्यावरच प्रसूती; शासकीय नर्सने मदत नाकारल्याचा आरोप
Buldhana News : बुलडाण्यातील मेहकर येथे ग्रामीण रुग्णालयापासून काही अंतरावर महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली. शासकीय नर्सने मदत नाकारल्याचा आरोप असून खासगी नर्सच्या मदतीने प्रसूती झाली.

Buldhana News : मेहकर शहरात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावर एका गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली. महिलेची अवस्था गंभीर असतानाही ग्रामीण रुग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या स्टाफ नर्सने घटनास्थळी येऊन मदत करण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर खासगी रुग्णालयातील नर्सच्या मदतीने महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली.
नेमकं काय घडलं?
मेहकर येथे संबंधित महिलेला मंगळवारी सकाळी सुमारे सहा वाजता अचानक प्रसूतीच्या तीव्र कळा सुरू झाल्या. तिला रुग्णालयात नेण्यासाठी घरात पुरुष मंडळी उपलब्ध नसल्याने ती स्वतःच रुग्णालयाकडे जाण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, वेदना असह्य झाल्याने ती रस्त्यावरील एका ओट्यावर कोसळली. यावेळी बाळाचा काही भाग बाहेर आल्याने परिस्थिती गंभीर झाली.
हा प्रकार योगेश सौभागे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. कर्तव्यावर असलेल्या स्टाफ नर्सला परिस्थितीची माहिती देऊन घटनास्थळी येण्याची विनंती केली. मात्र, डॉक्टर रुग्णालयात नसल्याचे आणि आपण एकट्याच असल्याने बाहेर येता येणार नसल्याचे सांगत नर्सने मदत करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे.
सौभागे यांनी महिलेचे बाळ अर्धे बाहेर आले असून तातडीने मदतीची गरज असल्याचे सांगून पुन्हा विनंती केली. मात्र, तरीही मदत मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.
खासगी नर्सच्या मदतीने प्रसूती –
यानंतर सौभागे यांनी तातडीने एका खासगी रुग्णालयातील नर्सशी संपर्क साधला. संबंधित नर्स घटनास्थळी पोहोचली. सौभागे यांच्या कुटुंबातील महिलांच्या मदतीने तिने रस्त्यावरच महिलेची प्रसूती केली. सुदैवाने बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप असून प्रसूतीनंतर त्यांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेमुळे मेहकर परिसरात संताप व्यक्त होत असून, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना मदत न करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.




