पुणे – कोरेगाव पार्कमधील साधू वासवानी पुलाच्या लोहमार्गावरील भाग पाडण्यासाठी रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करीत मेगाब्लॉक घेणे गरजेचे असताना याबाबत रेल्वे प्रशासनाकडून महापालिका प्रशासनाला अद्याप मान्यता मिळालेली नाही. महापालिकेकडून रेल्वेकडे पाठपुरावा सुरू असून, आगामी आठवड्यात ब्लॉकबाबत रेल्वेकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
महापालिका प्रशासनाकडून कोरेगाव पार्क येथे नवीन पूल बांधण्याचे काम सुरू केले आहे. या कामाचे एप्रिल २०२३ मध्ये उद्घाटन झाले. रेल्वे प्रशासनाकडून कोरेगाव पार्ककडील पूल पाडण्याच्या कामाला मंजुरी दिल्यानंतर जून २०२४ मध्ये कोरेगाव पार्ककडील पाडकाम सुरू करण्यात आले.
जुन्या पुलाचे पाडकाम ४० टक्के पूर्ण झाले आहे. तर, साधू वासवानी पुलाचा लोहमार्गावरील भाग पाडण्यासाठी रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेणे गरजेचे ठरणार आहे. परंतु, याचे योग्य वेळापत्रक मिळत नसल्याने पाडकाम काम रेंगाळत चालले आहे. रेल्वेकडून ब्लॉकला मंजुरी मिळणे गरजेचे आहे.
परंतु, येथील रेल्वे लाइन व्यस्तचे प्रमाण मोठे असल्याने लोहमार्गावरील पूल पाडण्याच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्याबाबत अद्यााप रेल्वे प्रशासनाकडून निर्णय होत नसल्याने पुलाचे पाडकाम करण्यात अडचण येत आहे. हा पूल पाडण्यासाठी छोटे ब्लॉक घेऊन टप्प्याटप्प्यानुसार पाडकाम करण्यासाठी रेल्वेकडून महापालिकेस परवानगी दिली जावू शकते.
त्यातच साधू वासवानी पुलाखाली झोपड्याही आहेत. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडून संबंधित झोपड्या हटविण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते परंतु. अद्याप कुठलीह कार्यवाही करण्यात आलेली नाही.
“लोहमार्गावरील पुलाचा भाग पाडण्यासाठी रेल्वे प्रासनाकडे पाठपुरावा करीत आहे. येत्या आठवड्याभरात रेल्वे ब्लॉकबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वेकडून पुलाच्या पाडकामास मान्यता दिली जाईल”- अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प विभाग, महापालिका.