Vidya Balan And Rekha: “रेखा अशा भेटल्या जणू पूर्वीच ओळख होती”, ‘परिणीता’तील पहिल्या भेटीच्या आठवणींत रमली विद्या बालन

Vidya Balan And Rekha: प्रदीप सरकार दिग्दर्शित ‘परिणीता’ हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. २९ ऑगस्ट २०२५ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, त्याला २० वर्षे पूर्ण होत आहेत. हा चित्रपट केवळ विद्या बालनच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाचा पुरावा नाही, तर तिच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीचाही महत्त्वाचा टप्पा आहे.
याच पार्श्वभूमीवर विद्या बालनने नुकतीच Filmfare या मासिकाशी संवाद साधला. यात तिने ‘परिणीता’तील रेखा यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या.
विद्या म्हणाली, “रेखा ज्या दिवशी ‘कैसी पहेली ज़िंदगानी’ हे गाणं शूट करत होत्या, त्या दिवशी माझं शूट नव्हतं. पण दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी मला सेटवर बोलावलं. मी आणि रायमा एकत्र रेखा यांच्या व्हॅनमध्ये गेलो. मी दारावर हळूच टकटक केलं. आणि त्या अशा भेटल्या की जणू आम्ही कित्येक वर्षांपासून एकमेकींना ओळखत होतो. त्या इतक्या प्रेमळ होत्या… आणि आजही आहेत.”
ती पुढे म्हणाली, “मी पहिल्यांदा रेखा यांचा फोटो ‘टाईम्स ऑफ इंडिया’ मध्ये पाहिला होता आणि मी अगदी थक्क झाले होते. तेव्हा मी त्यांचा एकही चित्रपट पाहिला नव्हता . पण मला वाटलं, ही कोण आहे ही इतकी सुंदर, स्वर्गीय व्यक्ती?”
विद्याच्या मते, तिच्या वडिलांचा सर्वात आवडता चित्रपट ‘खून भरी मांग’ हा होता, जो रेखाचा गाजलेला सिनेमा आहे.
‘परिणीता’ ही कथा आहे लोलिता (विद्या बालन) या तरुणीची, जी आपल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत मामा-मामीसोबत राहते. तिचं बालपणापासूनचं प्रेम आहे शेखरवर (सैफ अली खान), जो तिचा शेजारी आहे.
शेखरचा वडील नविनचंद्र (सव्यसाची चक्रवर्ती) हा एक श्रीमंत पण निर्दयी उद्योगपती आहे. तो लोलिताच्या मामाचं घर ताब्यात घेऊन तिथे हॉटेल बांधण्याचा प्रयत्न करतो. हे कळताच लोलिता मदतीसाठी दुसऱ्या श्रीमंत उद्योजकाकडे गिरीश शर्माकडे (संजय दत्त) जाते.मात्र शेखरला वाटू लागतं की लोलिता आणि गिरीश यांच्यात काहीतरी संबंध आहे. आणि इथून पुढे निर्माण होतो गैरसमजांचा गुंता…
ही खास मुलाखत आणि २० वर्षांच्या प्रवासाची आठवण आजही विद्याच्या आठवणीत ताजी आहे. आता ‘परिणीता’ पुन्हा थिएटरमध्ये झळकणार असल्याने प्रेक्षकांसाठी हा एक सुंदर नॉस्टॅल्जिक क्षण असणार आहे.





