Israel–Hamas war : गाझामधील १५ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धविराम कराराचा भाग म्हणून हमासने नुकतंच (शनिवार) सुमारे २०० पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात चार महिला इस्रायली सैनिकांची सुटका केली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, या चार सैनिकांना गाझामधील रेड क्रॉसकडे सोपवण्यात आले आहे. ‘करीना एरिव्ह, डॅनिएला गिल्बोआ, नामा लेव्ही आणि लिरी अल्बाग’ असे त्यांचे नवे आहेत. दरम्यान, या चार महिलांची सुटका होण्यापूर्वी, गाझा शहरातील पॅलेस्टाईन स्क्वेअरवर हमासचे बंदूकधारी आणि लोकांचा मोठा जमाव जमला होता. महिलांना पॅलेस्टाईनीच्या वाहनातून बाहेर काढून स्टेजवर आणण्यात आले. त्यानंतर तेथील गर्दीला हात हलवत ते रेड क्रॉसच्या वाहनांमध्ये चढले. गाझा येथील रेडक्रॉसकडे चारही ओलिसांना सोपवण्यात येताच, तेल अवीवमधील एका चौकात जल्लोष झाला जिथे ओलिसांचे कुटुंब आणि मित्र जमले होते. यावेळी चौघांच्या सुटकेचा कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह दाखवण्यात आला आणि तेल अवीवमधील लोक रडताना, हसताना आणि एकमेकांना मिठी मारताना दिसले. ७ ऑक्टोबर रोजी झाले अपहरण : या चारही महिला इस्रायली सैनिक आहेत ज्यांचे ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यादरम्यान इस्रायलच्या नाहल ओझ लष्करी तळावरून अपहरण करण्यात आले होते. ती लष्करी देखरेख युनिटची सदस्य होती. या चौघांच्या बदल्यात, इस्रायल २०० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडेल. एकूण, इस्रायल १८००-१९०० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार आहे. गेल्या रविवारी लागू झालेल्या युद्धबंदीच्या पहिल्या टप्प्यात, इस्रायलने गाझामध्ये बंदिस्त असलेल्या प्रत्येक इस्रायली सैनिकामागे ५० पॅलेस्टिनी कैद्यांना आणि इतर प्रत्येक महिला बंदिवानामागे ३० कैद्यांना सोडण्यास सहमती दर्शवली. तेव्हापासून कैद्यांची ही दुसरी अदलाबदल असेल. पहिल्या देवाणघेवाणीत तीन महिला इस्रायली बंधक आणि ९० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका झाली. अमेरिका, कतार आणि इजिप्तच्या नेतृत्वाखाली युद्धबंदीवर स्वाक्षरी : अमेरिका, कतार आणि इजिप्त यांच्या नेतृत्वाखाली इस्रायल आणि हमास यांच्यात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अप्रत्यक्ष चर्चेनंतर हा युद्धबंदीचा निर्णय झाला. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर सुरू झालेल्या युद्धाला या युद्धबंदी कराराने पूर्णविराम दिला. अंदाजे १,२०० लोक मारले गेले आणि २५१ जणांना ओलीस ठेवून गाझाला परत नेण्यात आले. ७ ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायलने गाझावरील युद्धात किमान ४७,२८३ पॅलेस्टिनी मारले गेले आहेत आणि १,११,४७२ जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.