पंतप्रधानांची परकीय गुंतवणूक वाढविण्याच्या रणनीतीवर बैठक

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे पूर्व उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी एक बैठक घेतली. या बैठकीत परकीय गुंतवणूक वाढविण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण, गृहमंत्री अमित शहा, वाणिज्य व उद्योगमंत्री व वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.
परकीय गुंतवणूकीत वाढ करण्याव्यतिरिक्त स्थानिक पातळीवरील गुंतवणूकीला चालना देण्यावरही चर्चा झाली. या बैठकीत गुंतवणूकदारांना निर्धारित मुदतीत सर्व प्रकारच्या केंद्रीय व राज्यस्तरीय मान्यता उपलब्ध करुन देण्यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आला. याशिवाय वेगाने भारतात गुंतवणूक आणण्यासाठी आणि देशांतर्गत क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध धोरणांवर चर्चा करण्यात आली.
गेल्या 24 तासांत 1हजार 823 नवीन प्रकरणे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1 हजार 823 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 67 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या वाढून 33 हजार 610 झाली आहे, त्यापैकी 1 हजार 75 जणांचं मृत्यू झाला आहे. तर या विषाणूपासून 8 हजार 373 रुग्ण बरे झाले आहेत.





