Nagar : ऊसदर दरासंदर्भात आज तहसील कार्यालयात बैठक

शेवगाव : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतेक सर्व साखर कारखाने सुरू झाले आहेत. अपवाद वगळता साखर कारखानदारांनी येत्या गळीत हंगामातील उसाचे दर जाहीर केले नाहीत. आचारसंहितेमुळे शेतकरी संघटनेने याबाबत साखर कारखानदारांना छेडले नव्हते.
परंतु आता आचारसंहिता शिथील झाल्याने ऊसदराच्या प्रश्नावर शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली असल्याने संघटनेच्या मागण्याबाबत समन्वयाने मार्ग काढण्यासाठी तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी तालुक्यातील साखर कारखान्याच्या व्यवस्थापक मंडळासमवेत शुक्रवारी दि. १३ ला तहसील कार्यालयात समन्वय बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती स्वाभिमान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी दिली.
येत्या गळीत हंगामात विना कपात ३ हजार शंभर रुपये पहिली उचल मिळावी. तसेच हंगाम पूर्ण झाल्यानंतर दुसरी उचल मिळावी. मागील हंगामामध्ये काही कारखान्यांनी ऊसाचे पैसे दिलेले नाहीत. ते व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत. ऊस जाळून उसाची तोड करू नये. कारखान्यांच्या वजन काट्याची शेतकरी संघटनाचे पदाधिकारी व कारखानदार यांचे समक्ष वजन काटा निरीक्षकांकडून तपासणी व्हावी.
सरकारच्या केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे कारखाने व ऊसाच्या बिलातून कोणत्याही प्रकारची कपात करू नये. ऊस वाहतूक करणारे सर्व वाहतूक चालक हे परवानाधारक असावेत, तसेच त्यांचा विमा उतरलेला असावा, या मागण्यांचे निवेदन मेलद्वारे सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्याचे लवांडे यांनी सांगितले.यासंदर्भात शनिवार दि. १४ डिसेंबरपर्यंत निर्णय घेऊन शेतकरी संघटना, कारखानदारांचे प्रतिनिधी व प्रादेशिक सहसंचालक यांची यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय जाहीर करावा, अन्यथा शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्यावतीने १६ डिसेंबर रोजी ऊसतोड वाहतूक बंद करण्याचा इशारा पत्राद्वारे दिला होता.





