Onion Rate : कांद्याचे दर पुन्हा गडगडले; शेतकऱ्यांना मोठा फटका

लासलगाव : आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणा-या लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, कांदा उत्पादक शेतक-यांचे सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात सुमारे ६०० रुपयांची घसरण झाली असून, मागील पंधरा दिवसांत तब्बल १ हजार रुपयांनी बाजारभाव खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांची चिंता अधिकच वाढली आहे.
लासलगावसह देशातील विविध कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने बाजारात दरांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. त्यातच बांगलादेशातील सुरू असलेल्या हिंसाचारामुळे भारतातून होणारी कांदा निर्यात मर्यादित प्रमाणातच सुरू असल्याने निर्यातीवर विपरीत परिणाम झाला आहे.
तसेच अरब देशांच्या बाजारपेठांमध्ये चीन आणि पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याला अपेक्षित मागणी मिळत नसल्याचे चित्र आहे. या सर्व परिस्थितीचा फटका थेट भारतीय शेतक-यांच्या उत्पन्नावर बसत असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतक-यांचे गेल्या पंधरा दिवसांत अंदाजे १७५ ते २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.





