Sanjay Raut : ‘मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन’; संजय राऊत यांचं विधान
Sanjay Raut : संजय राऊत यांनी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Sanjay Raut : ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यू प्रकरणामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यासोबतच मुख्य सूत्रधाराचाही शोध घेऊन त्याला गजाआड करण्याची मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राऊत यांनी या प्रकरणावरून आरोप होत असलेल्या शिंदे गटाच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांच्यावर निशाणा साधत थेट लेडी डॅान असा त्यांचा उल्लेख केला आहे. संजय राऊत यांनी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. या क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदे यांनी, “माझ्या नादाला लागलात तर सीपीला सांगून सरळ करीन,” अशी धमकी दिल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यू प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, पूर्णेकर यांचा खून आम्ही पचवू देणार नाही. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार आहोत. आरोपींना अटक झालीच पाहिजे. केवळ प्रत्यक्ष आरोपी नव्हे, तर या प्रकरणामागील मुख्य सूत्रधाराचाही शोध घेऊन त्याला अटक झाली पाहिजे.
ठाणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही सवाल
संजय राऊत यांनी ठाणे पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले काही अधिकारी कोणाच्या तरी एजंटप्रमाणे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
गणेश नाईकांनी ठाण्याचंं नेतृत्व केलं पाहिजे आम्ही त्यांना पाठिंबा देऊ : संजय राऊत
दरम्यान, भाजपचे नेते गणेश नाईक यांच्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. “गणेश नाईक गप्प का आहेत? त्यांनी पुढे आलं पाहिजे. ठाण्याचं नेतृत्व केलं पाहिजे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.” असं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांनी थेट गणेश नाईक यांनाच ठाण्याचे नेतृत्व करण्याचे आवाहन केल्याने ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.





