Raj Thackeray Post : मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या वतीने मुंबईत महामोर्चाचे आयोजन कारण…
Raj Thackeray Post : आता या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येत असून, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत महामोर्चा काढणार आहेत.

Raj Thackeray Post : SIR प्रक्रियेवरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येत असून, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत महामोर्चा काढणार आहेत.
राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या मोर्चाची माहिती दिली. SIR प्रक्रियेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (UBT) एकत्रितपणे हा जनमोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मोर्चाची वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या बातमीनुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर १४ वेळा आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपांमध्ये मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे किंवा पुन्हा समाविष्ट करणे, तसेच SIR आणि फॉर्म-६शी संबंधित मुद्द्यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे.” असं पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी SIR विरोधात एकत्रितपणे महामोर्चाची घोषणा केल्याने ४ ऑक्टोबरच्या आंदोलनाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या मोर्चात कोणते राजकीय पक्ष सहभागी होणार आणि ठाकरे बंधू या मुद्द्यावर नेमकी काय भूमिका मांडणार, याबाबत उत्सुकता आहे.
ED Raid: ‘आप’च्या खासदाराच्या आरोपांनंतर ED ची धडक ; GMADA प्रकरणात ५० तास छापे





