US-Israel-Iran war: युद्धग्रस्त इराणला भारताने पाठवली मोठी मदत; तेहरानने मानले आभार
US-Israel-Iran war: इराणचे राजदूत म्हणाले — भारत आमचा मित्र देश; दोन्ही देशांचे हित समान

US-Israel-Iran war: अमेरिका आणि इस्रायलशी सुरू असलेल्या संघर्षात अडकलेल्या इराणला भारताने वैद्यकीय मदत पाठवली आहे. औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची पहिली खेप इराणला यशस्वीरीत्या पोहोचल्यानंतर तेहरानने भारताचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाला आता दोन आठवड्यांहून अधिक काळ उलटला आहे.
वैद्यकीय मदतीची पहिली खेप पोहोचली –
भारताने पाठवलेली औषधे आणि वैद्यकीय उपकरणे इराणच्या रेड क्रेसेंट सोसायटीला सुपूर्द करण्यात आली आहेत. भारतातील इराणी दूतावासाने या मदतीबद्दल भारतीय जनतेचे आभार मानताना म्हटले, “ही वैद्यकीय सहायता यशस्वीरीत्या पोहोचवण्यात आली. इराण भारतातील सन्माननीय आणि दयाळू लोकांचे मनापासून आभारी आहे.”
इराणी राजदूत म्हणाले — भारत आमचा मित्र –
मदत मिळाल्यानंतर इराणचे राजदूत मोहम्मद फतहली यांनी सांगितले की, इराण भारताला आपला मित्र देश मानतो. दोन्ही देशांचे हित समान असल्याने एकमेकांच्या हिताचा आदर केला पाहिजे, असेही ते म्हणाले. फतहली यांनी आठवण करून दिली की, यापूर्वी अनेक देशांनी सहकार्य नाकारले असताना भारताने इराणला सागरी वाहतुकीसाठी जहाजे पुरवली होती. इराणने इतर देशांना कडक इशाराही दिला असून कोणत्याही कारवाईला उत्तर दिल्याशिवाय सोडणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
भारतीय नागरिकही इराणच्या मदतीसाठी पुढे –
सरकारी मदतीआधीच भारतीय नागरिकांनी इराणच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. इराण दूतावासाने १५ मार्च रोजी ‘X’ वर पोस्ट करत सांगितले होते की, इराणमधील पीडित नागरिकांसाठी मानवीय मदत पाठवण्यासाठी भारतीय बंधू-भगिनींनी दूतावासाकडे वारंवार विनंती केली होती. त्या अपीलाला प्रतिसाद म्हणून दूतावासाने नवी दिल्लीत एक बँक खाते जाहीर केले होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन हस्तांतरणात अडथळे येत असल्याचेही दूतावासाने नमूद केले होते.
— Iran in India (@Iran_in_India) March 17, 2026





