प्रभात ४८ वर्षांपूर्वी : जिल्ह्यातील नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा योजना

जिल्ह्यातील नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा योजना
पुणे, ता. 11 – जिल्ह्यातील जनतेसाठी वैद्यकीय सोयी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडे त्याची जबाबदारी टाकण्याची केंद्र सरकारची योजना असून पुणे जिल्ह्यापुरती ती जबाबदारी ससून रुग्णालयामध्ये टाकण्यात येईल.
यासाठी केंद्र सरकार दरवर्षी पाच लक्ष रुपये आर्थिक साहाय्य करेल अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री र. के. खाडीलकर यांनी येथे केली आहे. खाडीलकर यावेळी म्हणाले, ही प्रायोगिक योजना औरंगाबाद जिल्ह्यासही लागू होईल.
सर्वंकष वैद्यकीय सेवांची शहराला गरज आहे. रुग्णांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा विचार न करता त्यास वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी इच्छा आरोग्यमंत्री खाडीलकर यांनी प्रकट केली.
न्यूजप्रिंट गोंधळ लवकर संपवू
नवी दिल्ली – वृत्तपत्र कागदाच्या बाबतीत सध्या चालू असलेला गोंधळ लवकर मिटवण्याच्याबाबत इंडियन व इस्टर्न वृत्तपत्र कागद सोसायटीच्या वतीने करण्यात आलेल्या सूचनांचा लवकरच विचार करण्यात येईल, असे आश्वासन माहिती व नभोवाणी खात्याचे राज्यमंत्री आय. के. गुजराल
यांनी दिले.
स्त्री मल्ल!
नवी दिल्ली – “फ्री स्टाइल अथवा भारतीय पद्धतीने माझ्याबरोबर जगातल्या कोणत्याही स्त्री मल्लाने कुस्ती खेळून माझा पराभव करून दाखवावा’ असे जाहीर आव्हान रूस्तुमे हिंद ख्रिस्तिना कहलॉन हिने दिले आहे. कहलॉन 28 वर्षांची असून तिने आतापर्यंत
50 कुस्त्या खेळल्या आहेत. तसेच ती अजून एकदाही हरलेली नाही.





