वैद्यकीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

पुणे – राज्य सीईटी सेलने एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीयच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने 12 नोव्हेंबरपर्यंत नोदणी करता येणार आहे. तसेच महाविद्यालयांचे पर्याय 6 ते 13 नोव्हेंबरच्या कालावधीत भरावे लागणार आहे.
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची नीट प्रवेश परीक्षेचा निकाल गेल्या महिन्यात जाहीर झाला. मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नव्हती. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या प्रतीक्षेत पालक होते. अखेर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यानुसार एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीओटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीएएसएलपी, बीपी अँड ओ अशा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना 12 नोव्हेंबरपर्यंत संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे.
त्यानंतर 6 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत केवळ एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी महाविद्यालयाचे पर्याय भरता येईल. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता जाहीर होईल. प्रवेशाची पहिली निवड यादी 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे. या निवड यादीत प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना 20 नोव्हेंबरपर्यत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागेल.
दरम्यान, बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीओटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीएएसएलपी, बीपी अँड ओ या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेचे उर्वरित वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली. अधिक माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.





