Satara: जिल्ह्यातील ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट होणार, राजू भोसले; जिल्हा परिषदेत घेतला कामाचा आढावा
Satara जिल्ह्यात 2022- 23 पासून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे सुरु आहेत. यामध्ये २०२२- २३ मध्ये ६, २०२३- २४ मध्ये १८ व २०२४- २५ मध्ये २१ अशा एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

Satara: जिल्ह्यातील ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्याचे काम सुरु असून त्यातील काही कामे पूर्णत्वास गेली आहेत. उर्वरित कामेही दर्जेदार व्हावीत यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी सुचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांनी केल्या. या उपक्रमातून लोकांना जलद आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 2022- 23 पासून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे सुरु आहेत. यामध्ये २०२२- २३ मध्ये ६, २०२३- २४ मध्ये १८ व २०२४- २५ मध्ये २१ अशा एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. या कामाचा आढावा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेण्यात आला. त्यावेळी श्री. भोसले बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी सुनील चव्हाण, बांधकाम दक्षिणचे कार्यकारी अभियंता विद्याधर शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी, उपअभियंता, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
२०२२- २३ मधील कामे पूर्ण झाली आहेत. २०२३- २४ व २०२४- २५ मधील बहुतांश कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत. काही ठिकाणी जुना पत्रा व इमारतीमध्ये क्रॅक गेल्याने होणारी गळती काढणे, पेव्हर ब्लॉक लेव्हल व्यवस्थित करणे, रंगकाम, वॉटर प्रुफींग करणे, टॉयलेट व बाथरुम दुरुस्ती, वॉश बेसीन व दरवाजे बसवणे, पडलेली फरशी व टाईल्स बसविणे, बंद प्रसुतीगृहांची दुरुस्ती करावी. मलब्याची स्वच्छता करावी, वाठार स्टेशन व वाठार किरोली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार शवविच्छेदन गृह बांधण्यासाठी शाखा अभियंता, उपअभियंता यांनी अंदाजपत्रक सादर करावे, अशा सूचना श्री. भोसले यांनी केल्या.
तर ठेकेदार, अभियंत्यांना नोटीस काढा
उपअभियंता, तालुका आरोग्य अधिकारी व शाखा अभियंत्यांनी कामाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी. काम निकृष्ठ झाले त्या ठेकेदार व शाखा अभियंत्यांना नोटीस द्यावी. सर्व कामे एक महिन्याच्या आत करावीत. काम पूर्ण झाल्याशिवाय काम हस्तांतरण दाखल्यावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करु नये, अशा सूचना राजू भोसले यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिल्या.





