Women’s T20 World Cup 2024 : आम्ही कधीच फलंदाजीसाठी प्लॅनिंग करत नाही – शेफाली वर्मा

Women’s T20 World Cup 2024 (IND vs SL) – महिला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताने श्रीलंका संघाला 82 धावांनी पराभूत करताना स्पर्धेतील आगेकूच कायम राखली होती. या स्पर्धेत भारताने न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाला पराभूत केले होते. त्यानंतर श्रीलंका संघावर विजय मिळविण्यात भारताच्या दोन्ही सलामीवीर स्मृती मंधाना व शेफाली वर्मा यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
श्रीलंकेविरुद्ध सलामीवीर स्मृती मंधाना व शेफाली वर्मा यांनी 12.4 षटकांत 98 धावांची सलामी दिली होती. यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मोठा हातभार लागला होता. या सलामीमध्ये शेफाली वर्माने 40 चेंडूत 43 धावांची भागीदारी केली होती. या लढतीनंतर बोलताना शेफालीने, मी व स्मृती कोणत्याही प्रकारची योजना आखून फलंदाजी करत नसल्याचा खुलासा केला आहे.
या संदर्भात बोलताना शेफाली म्हणाली, मी आणि स्मृती कोणतेही प्लॅनिंग करून मैदानात उतरत नाहीत. मी आणि स्मृती, दोघींपैकी जो चांगली फलंदाजी करत असेल, त्याला जास्त चेंडू खेळण्याची आम्ही संधी देतो. त्यामुळे समोरचा फलंदाज लयीत आला, की दुसऱ्या फलंदाजावर असलेला ताण कमी होतो, असा खुलासा शेफालीने केला आहे.
यापूर्वी अनेक लढतीमध्ये शेफाली ही फिरकी गोलंदाजी विरुद्ध तर स्मृती वेगवान गोलंदाजाच्या विरोधात आक्रमक खेळी करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून स्मृतीने फिरकी गोलंदाजीला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेफालीवरील फिरकी खेळण्याचा ताण कमी होत आहे. यावर देखील शेफाली म्हणाली, स्मृती सध्या फिरकी गोलंदाजानावर चांगले आक्रमण करत आहे. ही चांगली गोष्ट आहे. आम्ही दोघीही संघासाठी चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न करत असतो.
धावगतीमध्ये सुधारणा…
श्रीलंकेला 82 धावांनी पराभूत केल्याने भारतीय संघाला अजूनही उपांत्य फेरीत दाखल होण्याची आशा आहे. भारत या स्पर्धेत अ गटामध्ये सहभागी झाला आहे. या गटामध्ये न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया हे सर्व दमदार संघ आहेत. पहिल्याच लढतीत भारताला न्यूझीलंड विरुद्ध पराभूत व्हावे लागल्याने भारताची धावगती देखील खालावली होती. भारताने पाकिस्तानवर विजय मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. त्यामुळे अपेक्षित धावगतीमध्ये खूपशी सुधारणा झाली नव्हती. मात्र, श्रीलंकेला 82 धावांनी पराभूत केल्याने भारताची निव्वळ धावगती 0.576 एवढी झाली आहे.
Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, उपांत्य फेरीच्या आशा कायम…
सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया संघाची 2.524 असून गटात ते अव्वल आहेत. न्यूझीलंड संघाच्या २ लढती झाल्या असून त्यांची धावगती उणे 0.050 अशी झाली आहे. श्रीलंका संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पाकिस्तानच्या अजून दोन लढती बाकी असून गटामध्ये पाकिस्तान तिसऱ्या स्थानी आहे.





