Raigad – रायगड जिल्ह्यातील एका केमिकल कंपनीवर छापा टाकून पोलिसांनी तब्बल 106 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे मेफेड्रोन जप्त केले आहे. या ठिकाणी पोल्स निर्मितीच्या आडून अंमली पदार्थ निर्मिती करण्याचा कारखाना तीन जणांनी सुरू केला होता. यातून एमडी पावडरची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. खोपोलीच्या ढेकू गावाच्या हद्दीत ‘इंडीया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी’चा फलक आहे. या कंपनीत आतमध्ये ‘आंचल केमिकल’ नावाची दुसरी एक कंपनी सुरू होती. या कंपनीत बेकायदेशीरपणे प्रतिबंधित अंमली पदार्थ बनविले जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कंपनीवर गुरूवारी रात्री छापा टाकला. यावेळी कंपनीत रासायनिक प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारून या ठिकाणी गुंगीकारक आणि प्रतिबंधीत मेफेड्रोन अर्थात एमडी तयार केले जात असल्याचे दिसून आले. नार्को तपासणी किटच्या मदतीने तपासणी केली असता कंपनीत तयार करण्यात येणारा माल हा एमडी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर ८५ किलो २०० ग्रॅम वजनाची एमडी पावडर पोलीसांनी जप्त केली. ज्याची बाजारातील किंमत ही १०६ कोटींच्या आसपास आहे. या शिवाय एमडी ड्रग पावडर बनविण्यासाठी वापरण्यात येणारे १५ लाख रुपयांचे कच्चे रसायन आणि ६५ लाख रुपये किंमतीची एमडी बनवण्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री पोलीसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक शितल राऊत हे पुढील तपास करत आहेत अशी महीती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.