Angelo Mathews’ Timed Out Dismissal : ‘मेरीलेबोन क्रिकेट क्लब’कडून पंचांची पाठराखण

लंडन – “विश्वकरंडक (#CWC23) सामन्यात अँजेलो मॅथ्यूजने योग्यरित्या पंचांची परवानगी घेऊन हेल्मेट बदलण्यासाठी मैदानाबाहेर जायला हवे होते. जर त्याने तसे केले असते तर तो टाईमआउट होण्यापासून स्वतःला टाळू शकला असता, तरी पंचांनी त्यावेळी दिलेला निर्णय अगदी योग्य होता,’ अशी पंचांची पाठराखण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांचे रक्षक असलेल्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) शनिवारी केली आहे.
मॅथ्यूज हा बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वेळेच्या मर्यादेत स्ट्राइक चुकवणारा व त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये “टाइम आउट’ या नियमाद्वारे बाद झालेला पहिला फलंदाज ठरला होता. सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात वेळेवर उतरल्यानंतर आपल्या हेल्मेटचा पट्टा तुटल्याचे मॅथ्यूजच्या लक्षात आले, त्यामुळे त्याने नवीन हेल्मेट मागवले. या दरम्याने किमान तीन मिनिटांचा विलंब झाला.
बांगलादेशने या विलंबाविरुद्ध अपील केले आणि पंचांनी वेळ काढला व त्याला बाद देण्यात आले. त्याला बाद देण्यावरून व बांगलादेश संघाच्या खिलाडूवृत्तीवरून यानंतर बराच वाद निर्माण झाला होता. “जेव्हा हेल्मेटचा पट्टा तुटला तेव्हा मॅथ्यूजने पंचांचा सल्ला घेतला नाही,’ असे एमसीसीने एका निवेदनात म्हटले आहे.
तसेच एमसीसीने पुुढे म्हटले की, जर त्याने पंचांना काय घडले ते सांगितले असते आणि वेळ मागितला असता, तर त्याला हेल्मेट बदलण्याची परवानगी मिळाली असती. यामुळे तो बाद होण्यापासून वाचला असता. जेव्हा अपील केले तेव्हा दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेला होता, तेव्हा पंचांनी त्याला बाद घोषित केले. क्रिकेटच्या नियमांनुसार पंचांचा तो निर्णय योग्य होता. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे माराइस इरास्मस आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ हे मैदानावरील पंच होते.





