SL vs BAN : तौहीद-सैफच्या जोरावर बांगलादेशचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, सुपर-4 मध्ये धमाकेदार सुरुवात!

SL vs BAN Bangladesh beat Sri Lanka : आशिया कप 2025 च्या सुपर-4 टप्प्यातील पहिल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर 4 गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने लीग टप्प्यात श्रीलंकेकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला. बांगलादेशच्या तौहीद हृदोय आणि सैफ हसन यांच्या दमदार फलंदाजीमुळे श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दासुन शनाकाच्या तुफानी अर्धशतकावर पाणी फिरले.
तौहीद आणि सैफची तुफानी फलंदाजी –
या दोघांनी मिळून 82 चेंडूंमध्ये 119 धावांची भागीदारी करत बांगलादेशला हा विजय मिळवून दिला. 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने 19.5 षटकांत 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. सलामीवीर सैफ हसनने शानदार खेळी करत 45 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 4 षटकारांसह 61 धावा केल्या.
Bangladesh get over the line ! Big win for them and this will throw open the table ! #SLvBAN #SLvsBAN #BANvSL #BANvsSL pic.twitter.com/dLzIOIuyeZ
— Cricketism (@MidnightMusinng) September 20, 2025
त्याने कर्णधार लिटन दाससोबत दुसऱ्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केली. लिटन दासने 16 चेंडूंमध्ये 3 चौकारांसह 23 धावा केल्या. तौहीद हृदोयने 37 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांसह 58 धावांची नाबाद खेळी केली. श्रीलंकेच्या गोलंदाजांपैकी वानिंदू हसारंगा आणि दासुन शनाकाने प्रत्येकी 2 बळी घेतले, तर नुवान तुषारा आणि दुष्मंथा चमिराला प्रत्येकी 1 बळी मिळाला.
हेही वाचा – SL vs BAN : तौहीद-सैफच्या जोरावर बांगलादेशचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, सुपर-4 मध्ये धमाकेदार सुरुवात!
दासुन शनाकाची झंझावाती अर्धशतकी खेळी
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने दासुन शनाकाच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर 7 बाद 168 धावा उभारल्या. शनाकाने 37 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 64 धावा केल्या. याशिवाय यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसने 25 चेंडूंमध्ये 1 चौकार आणि 3 षटकारांसह 34 धावा जोडल्या.
हेही वाचा – INDW vs AUSW : भारतीय संघाने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाविरुद्ध असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ
सलामीवीर पथुम निस्सांकाने 15 चेंडूंमध्ये 22 धावा केल्या, तर कर्णधार चरिथ असलंकाला 12 चेंडूंमध्ये 21 धावांवर धावबाद व्हावे लागले. बांगलादेशकडून वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर मेहदी हसनने 2 आणि तस्किन अहमदने 1 बळी घेतला.





