Mayor Ravi Landge : भोसरीचा उड्डाणपूल पाडू नका; महापौर रवी लांडगे आक्रमक…नेमकं प्रकरण काय?
Mayor Ravi Landge : पुणे-नाशिक महामार्गाच्या विस्तारीकरणावरून वाद; भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पूल पाडण्यास महापौर रवी लांडगे यांचा विरोध.

Mayor Ravi Landge – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने (एनएचएआय) पुणे-नाशिक महामार्गावरील कासारवाडीतील नाशिक फाटा ते खेड मार्गाचा विस्तार करण्यात येत आहे. त्या कामासाठी भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पुल पाडण्यात येऊ नये, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न, वाढती वाहतूककोंडी,
पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या तसेच, शहरातील महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महापौर लांडगे यांनी एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासमवेत बैठक घेतली. महापौरांनी शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या विविध प्रश्नांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. बैठकीत पुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी, नाशिक फाटा ते खेड उन्नत मार्ग प्रकल्पाची सद्यस्थिती, मुंबई-बंगळुरू महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांचे रुंदीकरण,
रस्त्यांची दुरुस्ती, जलनिस्सारण व्यवस्था, पावसाळ्यात महामार्गावर आणि अंडरपासमध्ये साचणारे पाणी, अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या तसेच, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. भोसरी येथील उड्डाण पूल कोणत्याही परिस्थितीत पाडण्यात येऊ नये. भोसरी गावठाण परिसरात अतिरिक्त भूसंपादन करण्यात येऊ नये. विकासकामांच्या नावाखाली स्थानिक नागरिकांना कोणताही अन्याय सहन करावा लागणार नाही, असे महापौरांनी स्पष्ट केले.





