सिंधुदुर्ग : अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, त्यांची मला कीव वाटते. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो. मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन. मी साईबाबांचा भक्त आहे. मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत. मंत्रिपद नसल्यामुळे आता मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी आनंदात आहे, असे दीपक केसरकरांनी वक्तव्य केले आहे. ते सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलत होते. मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर सुरुवातीला नाराज नसल्याचे सांगणारे दीपक केसरकर यांनी आता मात्र त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक बंगला नाकारल्यानंतर रामटेक बंगला चर्चेत आला आहे. मात्र रामटेक बंगल्यात जे जे राहिले आहेत ते ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोचल्याचा दावा दीपक केसरकरांनी केला. शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व मुख्यमंत्री झाले असे सांगत आपणही मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर जाईन असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. दीपक केसरकर म्हणाले की, मला केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे काळजी नाही. कुठल्याही मंत्र्याने कामे केली नसतील एवढी कामे मी माझ्या मंत्रिपदाच्या काळात असताना केली. मराठी भाषा विभाग, मुंबई शहर असो वा शिक्षण विभाग असो, या विभागात मी मोठी कामे केली. मी केलेल्या कामांची माहिती पुस्तिका काढणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आपली मान अभिमानाने ताठ राहिल असेच काम मी या आधी केले आगे आणि पुढच्या काळातही करेन.