Mayawati : मायावतींनी फेटाळला राहुल गांधींचा ‘तो’ प्रस्ताव

लखनौ : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे बसपच्या प्रमुख मायावती यांना विरोधकांच्या आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, मायावती यांनी तो फेटाळला. तसेच, कॉंग्रेसचे धोरण दुटप्पी असल्याचा पलटवारही केला. राहुल सध्या उत्तरप्रदेशातील त्यांच्या रायबरेली मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी एका ठिकाणी अनुसूचित जातींच्या (एससी) विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यघटनेच्या निर्मितीत दलितांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली.
त्याचवेळी भाजपविरोधी राजकीय लढ्यात मायावती सहभागी न झाल्याविषयी खंत व्यक्त केली. आमच्या समवेत मायावतींनी भाजपविरोधात लढावे अशी माझी इच्छा होती. मात्र, काही कारणास्तव त्यांनी तसे केले नाही. उत्तरप्रदेशात कॉंग्रेस, सप, बसप हे तीन पक्ष एकत्र आले असते; तर भाजप कधीच जिंकू शकला नसता, असे राहुल म्हणाले. त्यातून त्यांनी बसपने विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा घटक बनावे, अशी इच्छा व्यक्त केल्याची चर्चा सुरू झाली.
राहुल यांच्या वक्तव्यावर मायावती यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली. मजबूत स्थिती किंवा सत्ता असलेल्या राज्यात कॉंग्रेसचा बसपविषयीचा दृष्टीकोन द्वेष आणि जातीयवादी स्वरूपाचा असतो. त्याउलट, कॉंग्रेसची स्थिती कमजोर असणाऱ्या उत्तरप्रदेशसारख्या राज्यात तो पक्ष आघाडीची भाषा करतो, अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेसच्या धोरणातील विरोधाभास दाखवून देण्याचा प्रयत्न केला.





