Pune District : विघ्नहर्त्याने दुष्काळाचे विघ्न दूर करावे; हर्षवर्धन पाटलांचे श्रीगणरायाला साकडे
Pune District : इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी सोमवारी (दि. १४) सकाळी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात श्रीगणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

इंदापूर : राज्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे सावट गडद होत असताना शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित पावसाळ्यात दमदार परतीचा पाऊस पडून राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे, अशी मनोभावे प्रार्थना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रीगणरायाच्या चरणी केली.
इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी सोमवारी (दि. १४) सकाळी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात श्रीगणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. हर्षवर्धन पाटील, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील आणि युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करण्यात आली. या धार्मिक विधीचे पौरोहित्य राजमणी कुलकर्णी यांनी केले.
गणरायाचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि नवचैतन्याची पर्वणी’ असल्याचे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्रासह देश-विदेशात भक्तिभावाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. श्रीगणरायाच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात प्रगती, भरभराट आणि समाधान लाभावे, तसेच आगामी काळात दमदार पाऊस पडून शेतकरी व नागरिकांचे जीवन सुख-समृद्धीने फुलावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.
सध्या राज्यातील अनेक भागांत पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीसमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेला दिलासा देणारा पाऊस पडावा आणि राज्यावरील दुष्काळाचे संकट टळावे, हा भाव यंदाच्या गणेशोत्सवाच्या प्रार्थनेतून व्यक्त होत आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या.





