राज्यावरील सर्व संकटे दूर होऊ दे – आमदार थोरात यांचे श्री गणेशाला साकडे

संगमनेर – यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना सरकारने मदत करावी. राज्यात महिलांवरील अत्याचार व दूषित झालेले वातावरण कमी होऊन राज्यातील संकटे दूर होऊ दे तसेच देशात व राज्यात सर्वत्र बंधूभाव वाढीस लागून हा देश समर्थपणे चालावा, अशी प्रार्थना आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
सुदर्शन निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना झाल्यानंतर ते बोलत होते. श्रींची स्थापनावेळी आमदार बाळासाहेब थोरात, कांचनताई थोरात, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, संशोधक व कॅन्सरतज्ज्ञ प्रा. डॉ. हसमुख जैन आदी उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले की, यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. धरणे भरली आहेत.काही ठिकाणी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना सरकारने तातडीने मदत केली पाहिजे राज्यावरील आलेले सर्व संकटे दूर व्हावी, असे साकडेही त्यांनी श्री गणेशाला घातले. याप्रसंगी श्री गणेशाची आरती करून सुदर्शन निवासस्थानी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी थोरात कुटुंबीय उपस्थित होते.





