Maval Tourism: पर्यटकांसाठी गुड न्यूज! मावळातील पर्यटनस्थळांवरील बंदी अखेर मागे; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
Maval Tourism: ६ जुलैपासून लागू असलेले कलम १६३ अंतर्गतचे निर्बंध प्रशासनाकडून रद्द; परिस्थिती पूर्वपदावर आल्याने पर्यटकांना मोठा दिलासा.

Maval Tourism – पावसाचा जोर कमी झाल्याने आणि परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर आल्याने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लोणावळा ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आलेला बंदी आदेश रद्द केला आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी मावळातील प्रमुख पर्यटनस्थळे पुन्हा खुली झाली असून पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर धरण परिसर, धबधबे आणि पर्यटनस्थळांवर होणारे अपघात,
जीवितहानी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू केले होते. या आदेशानुसार धबधब्यांच्या मुख्य प्रवाहात जाणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे, हुल्लडबाजी करणे तसेच काही संवेदनशील भागांमध्ये वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर ओसरल्याने आणि परिस्थिती नियंत्रणात आल्याने प्रशासनाने या आदेशाचा फेरआढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे पर्यटन व्यवसायाशी संबंधित हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे, स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. निर्बंध हटविल्यानंतर आता पर्यटकांना एकविरा देवी मंदिर, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोणा आणि तुंग किल्ला, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट तसेच पवना धरण परिसरासह मावळातील प्रमुख पर्यटनस्थळांना भेट देता येणार आहे.
दरम्यान, प्रशासनाने बंदी आदेश रद्द केला असला तरी पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. धोकादायक ठिकाणी जाणे, पाण्याच्या प्रवाहात उतरून जीव धोक्यात घालणे, वाहनांची अनधिकृत पार्किंग करणे किंवा बेफिकीरपणे वावरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निर्बंध हटविल्यामुळे येत्या शनिवार-रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक या भागात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, स्थानिक पर्यटन व्यवसायालाही याचा मोठा दिलासा मिळणार असल्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे




