प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ (प्रभाकर तुमकर) – असे म्हटले जाते की राजकारणात कुणीही चिरकालीन शत्रू किंवा चिरकालीन मित्र नसतो. कालानुरुप परिस्िथती बदल घडवत असते आणि यालाच राजकारण म्हणतात. या उक्तींचा मावळ तालुक्यात सध्या प्रत्यय दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळात मावळ तालुक्याच्या राजकारणाने अनेक स्िथत्यंतरे अनुभवली आहेत. जशा जशा स्थानिक स्वराजाच्या निवडणुका जवळ येत आहेत. तशी तशी नवनवीन समीकरणे आकार घेताना दिसून येत आहेत. मावळच्या राजकारणात घडणाऱ्या घटना मावळवासीयांना चक्रावून टाकणाऱ्या आहेत. विशेषत: महायुतीत आपसातच सुरु असलेल्या राजकीय खेळ्या स्थानिक राजकारणात अ.िस्त्तव आणि वर्चस्वाचा सुप्त संघर्ष दर्शवित आहेत. महायुतीत सध्या मित्रपक्षापेक्षा आपली ताकद वाढविण्याची चढाओढ लागली आहे. विरोधकांना आपलेसे करुन तथाकथित आप्तेष्टांनाच धडा शिकविण्याची समीकरणे मांडली जात आहे. सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे सत्तेत असलेल्या तीनही पक्षांमध्ये सुरू असलेल्या या घडामोडींमध्ये विरोधी पक्ष राजकीय पटलावरुन हरवत चालल्याची भीती देखील जाणकार व्यक्त करत आहेत. खरच महायुतीत बेबनाव आहे की विरोधकांसाठी स्पेसच ठेवायचा नाही आपणच आपसात लढायचे अशी काही खेळी खेळली जात आहे का? असा देखील प्रश्न उपस्िथत होत आहे. भाजपा–राष्ट्रवादी मतभेद कायम.. महायुतीचे तीन प्रमुख घटक पक्ष – भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांतील नेते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासूनच एकमेकांविरोधात कुरघोड्या करत आहेत. विधानसभा निवडणुकीत तालुका वाटपाच्या करारातून राष्ट्रवादीला मावळची उमेदवारी मिळाली होती. मात्र भाजपातील काही नेत्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देत राष्ट्रवादीविरुद्धच काम केले. तरीदेखील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी एक लाखांहून अधिक मतांच्या आघाडीसह विजय मिळवला. या विजयामुळे राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची ताकद दाखवून दिली. आगामी स्थानिक स्वराज निवडणुकीनंतर भाजपाने राष्ट्रवादीच्या आमदाराला विरोध करणाऱ्या अनेक नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देत आपली शक्ती वाढविण्यास सुरुवात केली. याचाच अर्थ होता की तालुक्याच्या सत्तेत आता भाजपलाही वाटा हवा आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकत्र्यांमधील दरी वाढली. भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढण्यास तयार नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नवा ‘मावळ पॅटर्न’ ? राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे महायुतीत एकत्र असले तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत त्यांनी सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपच केले. या कटुतेची अनेक उदाहरणे अजूनही ताजी आहेत. तरीदेखील नुकत्याच झालेल्या एका भूमिपूजन सोहळ्यात भाजप व राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले आणि एकमेकांचे कौतुकही केले. त्यामुळे तालुक्यात नवे राजकीय समीकरण आकार घेते आहे का, याचीही चर्चा सुरू आहे.एकीकडे भाजप स्वबळावर ताकद आजमावण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी व शिवसेना मिळून एक नवा मावळ पॅटर्न तयार करणार का? या बाबतीतही चर्चांना उधान आले आहे. विरोधकांचे काय? मागील मुंबई महापालिकेची निवडणूक पाहिल्यास मुख्य लढत भाजप विरुद्ध शिवसेना अशीच झाली होती. त्या निवडणुकीत विरोधकांसाठी स्पेसच उरला नव्हता. तशीच काहीशी खेळी मावळातही खेळली जात आहे का? असा प्रश्न उपस्िथत होत आहे. एका स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही युतीसाठी तयार आहोत परंतु भाजपचे पदाधिकारी पुढकार घेण्यास तयार नाहीत. याचाच अर्थ भाजप स्वबळावर लढण्यास इच्छुक आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मित्रपक्ष शिवसेनेसोबत जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मात्र शांतता आहे. मविआतील दिग्गजांनी देखील भाजपची वाट धरली असल्याने मविआ कशी मोर्चेबांधणी करणार याकडेही सर्वांचेच लक्ष आहे. अन्यथा महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये होणाऱ्या लढतीत मविआ मागे पडण्याची भीती येथील जुने जाणकार व्यक्त करत आहेत.