Maval Politics : मावळात विकासाऐवजी देवदर्शन यात्रा ; महिला मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न

प्रभात वृत्तसेवा
कान्हे – तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. इच्छुक उमेदवारांकडून विविध प्रचारात्मक डावपेच आखले जात आहेत. विशेष म्हणजे, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही इच्छुकांनी अलीकडेच होम मिनिस्टर देवदर्शन यात्रा या नावाने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून, या उपक्रमाने तालुक्यातील मतदारांमध्ये चांगलीत चर्चा रंगवली आहे.
तालुक्यातील विविध गावांमधील महिलांसाठी काही इच्छुकांनी मोफत बससेवा, नाश्ता, भोजन, तसेच भेटवस्तूंच्या माध्यमातून देवदर्शन यात्रांचे आयोजन केले आहे. या यात्रांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी, या उपक्रमांच्या मागे राजकीय हेतू दडलेला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर अचानक श्रद्धा जागी झाल्याचे दृश्य नागरिकांना आश्चर्यचकित करणारे आहे.
विकासाच्या मुद्द्यांवर पडदा..
मावळ तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, आरोग्य आणि शिक्षणासंबंधी अडचणी या मूलभूत विषयांवर चर्चा अपेक्षित असताना देवदर्शन यात्रा, मेळावे आणि मनोरंजनप्रधान उपक्रम यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. विकास नाही, फक्त देवदर्शन असा टोमणा काही नागरिकांनी सोशल मीडियावर मारला आहे.
श्रद्धा की राजकीय रणनीती..
होम मिनिस्टर देवदर्शन यात्रा या उपक्रमाच्या नावाखाली मावळ तालुक्यातील विविध इच्छुक कार्यकर्ते महिला मतदारांना धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी नेत आहेत. या माध्यमातून स्वतःचा प्रचार साधण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे या उपक्रमांमागे श्रद्धेपेक्षा राजकीय रणनीती अधिक ठळकपणे जाणवत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
मावळ तालुक्यात आजही अनेक गावांमध्ये पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. तरीही निवडणुकीच्या काळात या विषयांवर कोणी बोलताना दिसत नाही. निवडणुका जवळ आल्यावर केवळ भेटवस्तू आणि यात्रांच्या मोहिमेत मतदारांना गुंतवले जाते, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. जागरूक मतदारांकडून अशा दिखाऊ उपक्रमांपेक्षा स्थानिक प्रश्न विचारून उमेदवारांची खरी तयारी तपासणे गरजेचे आहे. केवळ पैसा, भेटवस्तू किंवा पक्षाच्या नावावर मतदान करणे हे लोकशाहीसाठी धोकादायक ठरेल, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.



