Maval News : टाकवे बुद्रुकमध्ये स्टोन क्रशरविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; शेकडो नागरिक रस्त्यावर
मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील खंडोबा चौकात परिसरातील स्टोन क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले.

टाकवे बुद्रुक : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील खंडोबा चौकात परिसरातील स्टोन क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले. रखरखत्या उन्हात शेकडो महिला, व्यापारी, युवक आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात आंदोलन केले.
टाकवे, बेलज व परिसरातील स्टोन क्रशरमधून मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक, धूळ प्रदूषण आणि रस्त्यावर साचणारी खडी यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. स्टोन क्रशरमधून वाहतूक करणाऱ्या गाड्यामुळे संपूर्ण गाव धुळीने व्यापले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यावर पडणाऱ्या खडीमुळे लहान-मोठे अपघात वारंवार घडत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.
शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना, महिलांना दैनंदिन कामांसाठी बाहेर पडताना तसेच सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीने यापूर्वी स्टोन क्रशरला दिलेल्या सर्व परवानग्या व ठराव रद्द करून तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र शासन, संबंधित सर्व शासकीय विभागांना पत्रव्यवहार केला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान, परिसरातील ट्रक वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने गावातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांनाही तडे गेले असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. “एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार का?” असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
“स्टोन क्रशर हटवा, टाकवे गाव वाचवा”, “प्रशासन जागे व्हा”, “ग्रामस्थांना न्याय द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत असून प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर स्टोन क्रशर हटावसाठी आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.





