Maval News – आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी सजविलेल्या कमानी, भजन-कीर्तनाने भारलेला आसमंत आणि जय श्रीरामच्या जयघोषांनी दुमदुमलेला परिसर, अशा भक्तिमय वातावरणात मावळ तालुक्यात गुरुवारी (दि. २६) श्रीराम नवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. गावोगावच्या मंदिरांमध्ये दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने प्रभू श्रीरामांचे दर्शन घेत नामस्मरण करत उत्सवात सहभाग नोंदवला. रामनवमीनिमित्त पहाटेपासूनच मंदिरांमध्ये पूजा-अर्चा, अभिषेक आणि काकड आरतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच भाविकांची मंदिरांकडे गर्दी होऊ लागली होती. अनेक ठिकाणी मंदिर परिसर फुलांनी, पताका आणि रोषणाईने सजविण्यात आला होता. वडगाव मावळ येथील तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्या वतीने श्री दत्त मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी बारा वाजता रामजन्माचा सोहळा पार पडताना भजनाच्या ठेक्यावर हरीनामाचा गजर करत प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. महिलांनी पाळण्याची दोरी हातात घेऊन पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून श्रीराम जन्माचा सोहळा साजरा केला. या कार्यक्रमास देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे, भास्करराव म्हाळसकर, सचिव अनंता कुडे, विश्वस्त चंद्रकांत ढोरे, तुकाराम ढोरे, सुनिता कुडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत उत्सवाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडले. वारंगवाडी आणि कातवी या गावांमध्येही श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. संध्याकाळी मंदिर परिसरात दिव्यांच्या प्रकाशात वातावरण अधिकच आकर्षक बनले होते. भजन, कीर्तन आणि हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून भाविकांनी प्रभू श्रीरामांचे नामस्मरण केले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही रामनवमीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंदिर सजावटीसाठी आकर्षक रोषणाईचा वापर करण्यात आला होता. दिवसभर भजनाचे कार्यक्रम सुरू होते. नवलाख उंब्रे गावातील प्रसिद्ध स्वयंभू श्रीराम मंदिरातही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत हभप आसाराम महाराज बढे यांचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने प्रसाद वितरण करण्यात आले.