Maval News: मावळात भातलावणी रखडली! कडक उन्हामुळे बळीराजा चिंतेत; शेतातील पाणी आटले
Maval News: सुरुवातीच्या दमदार पावसानंतर मावळ तालुक्यात पावसाने अचानक घेतली विश्रांती; कडक ऊनामुळे शेतातील पाणी झपाट्याने आटल्याने लावणीची कामे ठप्प.

Maval News – तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. गेल्या दोन दिवसांत तालुक्यात पावसाचा थेंबही पडलेला नसून कडक ऊन पडत आहे. वातावरणातील या अचानक बदलामुळे तालुक्यात सुरू असलेली भातलावणीची कामे रखडली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मावळ हा भात उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी भाताची रोपे तयार केली होती.
आता ही रोपे लावणीयोग्य झाली असून अनेक ठिकाणी लावणीच्या कामांना वेग आला होता. मात्र अचानक पावसाने विश्रांती घेतल्याने आणि कडक ऊन पडू लागल्याने शेतातील पाणी झपाट्याने आटत आहे. चिखल करण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने भातलावणीची कामे थांबली आहेत. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहिल्यास तयार केलेली भाताची रोपे खराब होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे आता तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष पुन्हा पावसाकडे लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, परिसरात सोमवार आणि मंगळवारी मुख्यत्वे ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता अत्यल्प आहे. त्यामुळे उकाडा आणि कडक ऊन कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, बुधवारपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.





