Pawan Maval : मुसळधार पावसाने पवन मावळ बहरला; डोंगरदऱ्या हिरवाईने नटल्या
Pawan Maval : धबधबे प्रवाहित, पर्यटकांची मोठी गर्दी

पवनानगर – संततधार आणि मुसळधार पावसाने संपूर्ण पवन मावळ परिसर अक्षरशः जलमय झाला आहे. या पावसामुळे एकीकडे जनजीवनावर परिणाम झाला असला, तरी दुसरीकडे निसर्गानेही आपले मनमोहक आणि विलोभनीय रूप धारण केले आहे.
डोंगरदऱ्या हिरवाईने नटल्या असून कड्याकपाऱ्यांतून कोसळणारे असंख्य धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत. परिणामी, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरातून हजारो पर्यटकांनी पवन मावळकडे धाव घेतली आहे.
मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे ओढे, नाले आणि लहान-मोठे जलस्रोत तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले असून सखल भागांत वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम तालुक्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यावर झाला.
पवना, आंद्रा आणि वडीवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. यामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसामुळे पवन मावळ परिसरातील डोंगररांगांनी हिरवाईची चादर पांघरली आहे. दाट धुके, थंडगार वारे आणि कड्यावरून फेसाळत कोसळणारे शुभ्र धबधबे यामुळे संपूर्ण परिसराला एखाद्या हिल स्टेशनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तिकोणा, तुंग, लोहगड, विसापूर, पवनानगर आणि परिसरातील अनेक ठिकाणी निसर्गप्रेमी आणि पर्यटक भेट देत आहेत.
पावसाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होताच हजारो पर्यटकांनी पवन मावळकडे मोर्चा वळवला. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे.
धबधब्यांच्या परिसरात तरुणाईचा उत्साह विशेष पाहायला मिळत आहे. पावसाचा आनंद घेत सेल्फी, छायाचित्रण आणि सोशल मीडियासाठी रिल्स तयार करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
अनेक पर्यटक कुटुंबासह निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र, वाढत्या गर्दीमुळे काही पर्यटनस्थळांवर वाहनांच्या रांगा लागल्या असून काही मार्गांवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. विशेषतः अरुंद घाटरस्ते आणि धबधब्यांकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
एकीकडे मुसळधार पावसामुळे काही भागांतील जनजीवन प्रभावित झाले असले, तरी दुसरीकडे पवन मावळचा निसर्ग नव्या रूपात खुलून आला आहे. हिरवाईने नटलेले डोंगर, फेसाळणारे धबधबे, धुक्याची दुलई आणि थंडगार वातावरण अनुभवण्यासाठी पवन मावळ पुन्हा एकदा पर्यटकांचे आकर्षण ठरत असून, मान्सून पर्यटनाचा हंगाम रंगात आला आहे.
प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन
वाढती पर्यटकांची गर्दी आणि मुसळधार पावसाचा जोर लक्षात घेता स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. धबधबे, नदीकाठ आणि गर्दीच्या पर्यटनस्थळांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासोबतच धोकादायक ठिकाणी पोलिसांकडून सतत गस्त घातली जात आहे.
पर्यटकांनी कोणताही जीव धोक्यात घालू नये, यासाठी प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात आहेत. प्रशासनाने पर्यटकांना धबधब्यांच्या मुख्य प्रवाहात किंवा वेगवान पाण्यात उतरू नये, निसरड्या कड्यांवर किंवा डोंगरकड्यांवर सेल्फी काढण्यासाठी जाऊ नये, तसेच नदी-नाले ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट आवाहन केले आहे.





