प्रभात वृत्तसेवा पवनानगर – शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांचे जीवनमान निश्चितच उंचावले, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. येळसे येथील पवना संस्कृती साई रोझेस या अत्याधुनिक फुलशेती प्रकल्पाला बाळासाहेब थोरात व त्यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रकल्पाची पाहणी करताना ते बोलत होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे उभारलेल्या या प्रकल्पाचे कौतुक करताना युवा शेतकरी मुकुंद ठाकर यांचे थोरात यांनी विशेष अभिनंदन केले.थोरात यांनी पॉलीहाऊसमधील फुलांच्या विविध जाती, पाणी व्यवस्थापन, खत नियोजन तसेच उत्पादन प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी आढावा घेतला व आधुनिक शेती पद्धती स्वीकारण्याचे आवाहन केले. यावेळी पॉलीहाऊस शेतीमुळे पारंपरिक शेतीला सक्षम पर्याय मिळून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढत असल्याचे थोरात यांनी नमूद केले. यावेळी पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर, ज्ञानेश्वर ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, चंद्रकांत कालेकर, सरपंच सीमा ठाकर, संदीप भुतडा, नवनाथ ठाकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.