Maval Dairy Business – मावळातील शेतकर्यांना सध्या गुरांच्या चारा टंचाईमुळे आणि वाढलेल्या पशुखाद्यांच्या किंमतीमुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. सध्या पश्चिम आशियात चालू असलेल्या युद्धामुळे झालेल्या इंधनदरवाढीमुळे वाहतुकीला लागणार्या खर्चात वाढ झाल्याने मावळातील शेतकर्यांवरही याचा परीणाम दिसून येत आहे. एकीकडे चाऱ्याची टंचाई असतानाच दुसरीकडे खाद्याचे दर देखील गगनाला भिडले आहेत. तर यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोमुळे कमी पावसाचा आणि पावसाळ्यात मोठा खंड पडण्याचा अंदाज, पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेली खतटंचाई आणि खनिज तेलाचा तुटवडा आदी कारणांमुळे यंदाचा खरीप हंगाम आव्हानात्मक ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आधीच दुग्धव्यवसायात तोटा सहन करत असल्यामुळे शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या काही दूधकंपन्यांनी दूधाचे दर वाढवले असले तरी पशुपालनाच्या अतिरिक्त खर्चामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. मावळ तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय केला जातो. मात्र, गेल्या महिन्याभरापासून दुधाच्या खरेदी दरात घट झाल्याने तालुक्यातील पशुपालक कमालीचे चिंतेत आहेत. एकीकडे उन्हाचा कडाका वाढल्याने चारा आणि पाण्याचे संकट गहिरे झाले असताना, दुसरीकडे दुधाला मिळणारा भाव कमी झाल्याने मावळचा बळीराजा आर्थिक चक्रव्यूहात अडकला आहे. चारा टंचाई. काही कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. जनावरांना मिळणारे उसाचे वाढे कमी होऊ लागले आहे. त्यामुळे ओला चारा मिळत नाही. यामुळे गायींच्या दुधावरही याचा परिणाम झाला आहे. १० ते १२ लिटर दूध देणार्या गायी आता ६ ते ७ लिटरवर आल्याने दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. उन्हामुळे भेडसावत असलेल्या चाराटंचाईने शेतकरी हतबल झाला आहे. सध्या बाजारात पशुखाद्य आणि चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. सद्यस्थितीत दुधाचा उत्पादन खर्च अंदाजे प्रतिलिटर ३५ ते ३८ रुपयांवर गेला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मिळणारा नफा तर दूरच, उलट पदरचे पैसे लावून जनावरे सांभाळण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. रब्बी हंगामात केलेली पिके काही अपवाद वगळता पाण्याअभावी वाया गेली आहेत. परिणामी, चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनत चालला असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. रब्बीचे क्षेत्रही जवळपास ५० टक्के कमी झाले आहे. परिणामी सुका चाराही उपलब्ध झालेला नाही. शेतीवरच दूध व्यवसाय अवलंबून आहे. आता चाऱ्याअभावी यात कमालीची घट झाली आहे. ज्यांचे उसाचे जास्त क्षेत्र आहे, त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून हा ऊस कापून जनावरांना घालत, वैरणीला विकला होता, तर अनेकांचे ऊसक्षेत्र कमी असल्याने त्यांच्या व्यवसाय कमालीची घट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.