Alephata Market – परिसरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असताना त्याची सर्वाधिक झळ पशुपालकांना बसू लागली आहे. वाढत्या चारा टंचाई आणि पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी हतबल झाले असून, या संकटाचे स्पष्ट प्रतिबिंब आळेफाटा येथील जनावरांच्या आठवडे बाजारात दिसून येत आहे. एकेकाळी गजबजणाऱ्या या बाजारात सध्या विक्रीपेक्षा ‘मजबुरीतून होणारी विक्री’ अधिक होत असल्याचे चित्र असून, जनावरांच्या किमती कमी होऊनही खरेदीदार फिरकत नसल्याने बाजारात शांतता पसरली आहे. गुरूवारी भरलेल्या बाजारात पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर संकरित गायींची आवक झाली खरी, मात्र नवीन जनावरे घेण्यास शेतकरी धजावत नसल्याने व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. चारा टंचाई. पशुपालक बाळासाहेब जगताप यांनी सांगितले की, चारा महागला असून पाण्याची सोय नसल्याने घरची जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे, त्यामुळे नाईलाजास्तव जनावरे विकायला काढावी लागत आहेत. दुसरीकडे, मराठवाड्यातून आलेले शेतकरी संतोष गायकवाड यांनी सांगितले की, गायी स्वस्त मिळत असल्या तरी पाणी नसल्यामुळे नवीन जनावर आणणे सध्या तरी शक्य नाही. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात गुरुवारी सुमारे ३१४ गायी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी २९६ गायींची विक्री झाली असली, तरी व्यवहारांची गती अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी होती. दिवसभरात ५ हजार ते ५६ हजार रुपयांच्या दरम्यान व्यवहार झाले असून एकूण ६० लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती बाजार समितीचे संजय काळे, सचिव कवडे आणि व्यवस्थापक सतीश म्हस्करे यांनी दिली. पावसाळा लांबला किंवा पाणी टंचाई आणखी वाढली, तर भविष्यात दूध उत्पादनावर आणि शेतीपूरक व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आळेफाटा बाजारातील सध्याची स्थिती पाहता, उन्हाच्या तडाख्याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला बसल्याचे स्पष्ट होत आहे. बाजारात गायींची संख्या पुरेशी असली तरी चारा-पाण्याच्या चिंतेमुळे खरेदी-विक्रीचे चक्र थंडावल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.