माऊली, माऊली…पालखी सोहळ्यातील ज्ञानोबांच्या पादुकांना नीरा स्नान

Updated On:

राहुल शिंदे
नीरा  – नीरा भिवरा पडता दृष्टी । स्नान करिता शुद्ध सृष्टी।। अंती तो वैकुंठप्राप्ती । ऐसे परमेष्ठी बोलिला ।। “माऊली माऊली’ नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात रविवारी (दि. 18) माऊलींच्या पादुकांना शाहीस्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन माऊलींचा पालखी सोहळा सुरू करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्‍कामासाठी रवाना झाला.

पालखी सोहळा सकाळी साडेसहा वाजता रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हानगरीचा निरोप घेऊन सोहळा लोणंद मुक्‍कामी मार्गस्थ झाला. सकाळी आठ वाजता न्याहरीसाठी पिंपरे खुर्द येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसावाला. पिंपरे व पिसुर्टी ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ग्रामीण भागातील लोक बेसन-भाकरी, वेगवेगळ्या चटण्या, खरडा, ताज्या रानभाज्या, अशी शिदोरी घेऊन आले होते. अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी व विश्रांतीसाठी नीरेकडे मार्गस्थ झाला.

नीरा नगरितील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माऊलींचा पालखी सोहळा साडेदहा वाजता दाखल झाला. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले. 11 वाजता पालखी सोहळा नीरा नदीच्या काठावरील नयनरम्य विसावास्थळी विसावला. नीरा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखी तळाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

ब्रिटिशकलीन पुलावरून पालखी सोहळा जाताना (मंद वारा सुटला होता.) पैल तीरावर पालखीतील पादुका सोहळ्याचे मालक राजाभाऊ पवार-आरफळकर यांच्याकडे देण्यात आल्या. आरफळकरांसह सोहळयाचे प्रमुख विश्‍वस्त ऍड.विकास ढगे पाटील, विश्‍वस्त योगेश देसाई यांसह सोहळ्यातील मानकऱ्यांनी माऊलींच्या पादुका दत्तघाटावर आणल्या. “माऊली माऊली’ नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पादुकांना पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दत्तघाटावर तसेच नदी तिरावर एकच गर्दी केली होती.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्‍त अधीक्षक आनंद भोईटे, पुरंदर-भोरचे पोलीस उपअधीक्षक तानजी बरडे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विक्रम राजपूत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. अभय तिडके, गटविकास अधिकारी अमिता पवार, विराज काकडे, कांचन निगडे, कुमार मोरे, ग्रामविकास अधिकारी मनोज ढेरे यांनी सोहळ्याला निरोप दिला.

मानाचे दोन अश्‍व, भगव्या पताका…

नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून सर्वांत पुढे तुतारी वादक सलामी देत होते, मानाचे दोन अश्‍व, भगव्या पताका व विणा घेतलेले वारकरी आणि माऊलींचा फुलांनी सजवलेला रथ नीरा स्नानासाठी वैभवी लवाजम्यासह चालत होता.
झाडे तोडल्याने सावली दुरापास्त
वाल्हे ते नीरा दरम्यानच्या रस्त्यावरील जुनी झाडे तोडल्याने वारकऱ्यांना सावली दुरापास्त होती. प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायतींना रस्त्याच्या कडेला सावली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनाने तशी सोय करण्याचा प्रयत्न ही केला मात्र लखो वारकऱ्यांच्या पुढे ही सोय तोकडी पडली. त्यामुळे यावर्षी पालखी सोहळ्याला उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.

आणखी संबंधित बातम्या

Pune District : शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

2026-08-23 08:34:50

Pune District : शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

Pune District : निमगाव सावामध्ये पाण्याचा प्रश्न मिटला

2026-08-23 08:29:39

Pune District : निमगाव सावामध्ये पाण्याचा प्रश्न मिटला

Pune District : दुर्बिणीद्वारे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सुरू

2026-08-23 08:21:53

Pune District : दुर्बिणीद्वारे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सुरू

Pune District : विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षकांना दुचाकीची गुरुदक्षिणा

2026-08-23 08:14:47

Pune District : विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षकांना दुचाकीची गुरुदक्षिणा

Pune District : 'पुणे जिल्हा शिक्षण मंडळ' अजितदादांच्या दूरदृष्टीचे प्रतीक : सुनेत्रा पवार

2026-08-23 08:04:55

Pune District : 'पुणे जिल्हा शिक्षण मंडळ' अजितदादांच्या दूरदृष्टीचे प्रतीक : सुनेत्रा पवार