Mayursingh Patil : भाजपला धक्का ; मयूरसिंह पाटील काँग्रेसमध्ये
Mayursingh Patil : या पक्षप्रवेश सोहळ्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लहू (अण्णा) निवंगुणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष लहू निवंगुणे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र मयूरसिंह पाटील यांना प्रदान करण्यात आले.

इंदापूर : इंदापूर तालुक्याच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, भारतीय जनता पक्षाचे युवक नेते तथा भाजप जिल्हा कोअर कमिटीचे माजी सदस्य मयूरसिंह अरुणराव पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुणे येथील पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.
विशेष म्हणजे, काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांच्यावर इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे भाजपला इंदापुरात राजकीय धक्का बसला असून, काँग्रेसच्या गोटात नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून संघटनात्मक पुनर्बांधणीच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
या पक्षप्रवेश सोहळ्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लहू (अण्णा) निवंगुणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष लहू निवंगुणे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र मयूरसिंह पाटील यांना प्रदान करण्यात आले.
मयूरसिंह पाटील यांचे चुलते तथा माजी खासदार कर्मयोगी शंकरराव पाटील यांनी आपली संपूर्ण राजकीय हयात काँग्रेस पक्षामध्ये व्यतीत केली. काँग्रेसची विचारधारा, सहकार चळवळ आणि ग्रामीण भागातील जनसामान्यांचे प्रश्न यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी इंदापूरच्या राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील काँग्रेसच्या राजकीय परंपरेला मोठा धक्का बसला होता.
आता याच राजकीय कुटुंबातील मयूरसिंह पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नव्या राजकीय पर्वाची चर्चा सुरू झाली आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन काँग्रेस पक्षाला त्याच विचारधारेनुसार बळकटी देणार असल्याची ग्वाही मयूरसिंह पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या राजकीय विचारांचा वारसा पुढे नेणारे नेतृत्व म्हणून मयूरसिंह पाटील काँग्रेसमध्ये सक्रिय होणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सहकारातील अनुभव ही जमेची बाजू
मयूरसिंह पाटील यांनी यापूर्वी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच इंदापूर दूधगंगा संघाचे चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सहकार क्षेत्रातील अनुभव, ग्रामीण भागातील संपर्क आणि युवकांमधील संघटनात्मक ताकद या त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात.





